Join us  

या मराठी कलाकारावर आलीये हमाली करण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2017 11:52 AM

आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने एका मराठी कलाकाराला हमाली करावी लागत आहे. एखाद दिवस हमालीचे काम केले नाही तर त्यांच्या घरात चूल पेटणार नाही अशी स्थिती आहे.

कलाकार हा कलेसाठी आपले आयुष्य वेचत असतो. पण अनेकवेळा या कलाकारांना त्यांच्या उतारवयात अतिशय वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो. अनेक वेळा हलाखीची परिस्थिती असल्याने हाताशी येईल ते काम त्यांना करावे लागते. आला बाबुराव हे गाणे आपल्याला प्रत्येक डिजेमध्ये ऐकायला मिळते. या गाण्याशिवाय डिजे आपल्याला अपूर्ण वाटतो असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. या गाण्यावर बेफाम होऊन नाचण्याचा काही वेगळाच आनंद असतो. या गाण्यामुळे बाबुराव उर्फ सुरेश कांबळे हे नाव लोकांच्या घराघरात पोहोचले. पण आज हेच सुरेश कांबळे हलाखीचे जीवन जगत आहे. एबीपी माझा या वाहिनी च्या वृत्तानुसार सुरेश कांबळे आज हमालीचे काम करत आहेत. एखाद दिवस हमालीचे काम केले नाही तर त्यांच्या घरात चूल पेटणार नाही अशी स्थिती आहे. सुरेश कांबळेंवर ही परिस्थिती कशी ओढवली हा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. सुरेश कांबळे यांच्या गाजलेल्या गाण्यासाठी त्यांना एक रुपयाही न मिळाल्याने आज ते अतिशय वाईट परिस्थितीत राहात आहेत. सुरेश कांबळे यांचे आला बाबूराव हे गाणे डिसेंबर २०१६ ला प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. हे गाणे सुमित म्युझिक कंपनीने बनवले होते. या गाण्यासाठी सुरेश यांना किती मानधन मिळणार याविषयी कोणताही करार करण्यात आला नव्हता. मानधनाबाबत सगळ्या गोष्टी या तोंडी झाल्या होत्या. या गाण्यासाठी काहीतरी मानधन तरी मिळेल या आशेने सुरेश या गाण्याचा भाग बनले. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या आधी मानधन देण्याचे सुमीत म्युजिक कंपनीने कबूल केले होते. हे गाणे खूपच चांगल्या प्रकारे सुमीत म्युझिक कंपनीने चित्रीत केले आणि काहीच दिवसांत हे गाणे लोकांनी डोक्यावर घेतले. या गाण्यामुळे सुमीत म्युझिक कंपनीला चांगलाच फायदा झाला. पण हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्यासाठी एकही रुपया सुरेश यांना देण्यात आलेला नाही. त्यांचे कुटुंब हे भले मोठे आहे. त्यामुळे घरातील इतक्या लोकांचे पोट कसे भरायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.