मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. नुकतेच संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम लग्नबेडीत अडकले. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्याचा नुकताच साखरपुडा पार पडला. हा अभिनेता म्हणजे ऋषी मनोहर. काल ३ मे २०२३ रोजी अभिनेता ऋषी मनोहर (Rishi Manohar) आणि त्याची खास मैत्रीण तन्मई पेंडसे यांची एंगेजमेंट सेरेमनी पार पडली. यावेळी त्यांच्या सोहळ्याला उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी आवर्जून हजेरी लावली होती.
ऋषी मनोहरने काही दिवसांपूर्वीच तन्मईला ऑफिशियल प्रपोज केले होते. त्यावेळी सेलिब्रिटींनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. ऋषी हा चित्रपट, नाट्य अभिनेता आहे. तसेच दिग्दर्शक म्हणूनही त्याने मराठी इंडस्ट्रीत काम केलेलं आहे. उमेश कामतच्या दादा एक गुड न्यूज आहे या नाटकातून ऋषी मनोहर याने व्यावसायिक नाट्य सृष्टीत पदार्पण केले. एका काळेचे मनी या वेबसिरीजमध्ये त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तर कन्नी हा त्याचा आगामी मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
ऋषीचे वडील राजेंद्र हे क्रिकेटर आहेत तर आई सुप्रसिद्ध अभिनेत्री पौर्णिमा मनोहर या मराठी इंडस्ट्रीत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. लहानपणी ऋषीला क्रिकेटची आवड होती, पण कॉलेजमध्ये असताना तो रंगभूमीशी जोडला गेला. पौर्णिमा मनोहर यांनी उंबरठा या चित्रपटात स्मिता पाटील सोबत बालकलाकार म्हणून काम केले होते. शाळेत असतानाच पौर्णिमा यांना अभिनयाची आवड निर्माण झाली होती. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव पौर्णिमा गणू. पेट पुराण, राजवाडे अँड सन्स, चिंटू, तुझं माझं जमेना, पांडु अशा चित्रपटातून त्यांनी सहाय्यक भूमिका साकारलेल्या आहेत.