Join us  

"मी कुठलाही भत्ता घेतला नाही...", सिद्धीविनायक मंदिरातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर आदेश बांदेकर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 5:43 PM

Aadesh Bandekar : आदेश बांदेकर यांनी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी गेली अनेक वर्षे सांभाळली होती. मात्र त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली. सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.

होम मिनिस्टर या गाजलेल्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे आदेश बांदेकर (Aadesh Bandekar). आदेश बांदेकर यांनी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी गेली अनेक वर्षे सांभाळली होती. मात्र शिवसेना शिंदे गटाकडून आदेश बांदेकर यांना मोठा धक्का देण्यात आला आणि त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली. सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर आदेश बांदेकर भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात आले. दरम्यान आता लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आरोपांसह अनेक गोष्टींचा खुलासा केला.

आदेश बांदेकर लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांवर बोलले. ते म्हणाले की, आपण अध्यात्म मानतो. मी पत्रकार परिषद घेतली तेव्हाही सांगितले होते की, शेवटी मला सिद्धीविनायकाला उत्तर द्यायचंय. मी सहा वर्ष सिद्धीविनायकाचा अध्यक्ष होतो. माझे एकही वावचर मंदिरात नाही आहे. मी एक लाडू जरी मंदिरातून घेतला तरी त्याचे पैसे दिलेले आहेत. त्याचा सगळा रेकॉर्ड आहे. सिद्धीविनायक मंदिर न्यास समितीमध्ये काम करताना मला राज्यमंत्रीपदाचा दर्जा होता. ज्या दिवशी मला राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला, त्या दिवशी मी विधीन्याय विभागाला पत्र दिले आहे, की कुठलाही भत्ता घेणार नाही आणि मी तो घेतलाही नाही.

ते पुढे म्हणाले की, अशा देवस्थानांमध्ये काम करायला मिळणे हीच आई वडिलांची पुण्याई असते, असे मला वाटते. जेव्हा आपण तिथे काम करतो, तेव्हा तिथे येणारा भाविक, त्याने दानपेटीत टाकलेल्या एकेक रुपयाचे मोल असते. त्यामुळे मला सिद्धीविनायकाची सेवा करायला मिळाली हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

जेव्हा वैद्यकीय मदतीचा चेक मी सही करुन द्यायचो आणि ते पैसे मिळाल्यानंतर ती माऊली मदत डोक्याला लावायची, तेव्हा असे वाटायचे तो पावला म्हणून. त्यामुळे तिथल्या रुपयाचेही मोल आहे आणि तिथे चुकीचा विचार मनात येईलच कसा.

टॅग्स :आदेश बांदेकरसिद्धिविनायक गणपती मंदिर