Join us  

‘मी येतोय’सिनेमामधून छोटा पुढारी रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 8:29 AM

'मूर्ती लहान पण किर्ती महान' असं ज्याच्याबद्दल म्हटलं जातं,शेतक-यांचा लहानगा मात्र बुलंद आवाज असं ज्याचं वर्णन केलं जातं. तो ...

'मूर्ती लहान पण किर्ती महान' असं ज्याच्याबद्दल म्हटलं जातं,शेतक-यांचा लहानगा मात्र बुलंद आवाज असं ज्याचं वर्णन केलं जातं. तो राजकारण्याप्रमाणे बोलत असला तरी तो राजकारणी नाही आणि ग्रामस्थांचे तसंच शेतक-यांचे प्रश्न अस्सल गावरान भाषेत मांडणारा, ज्याला माध्यमांनीही झळकवलं अन् छोटा पुढारी असं त्याचं नामकरण केलं तो म्हणजे अहमदनगरचा घन:श्याम दरोडे. त्याच्या अनोख्या भाषा शैलीमुळे तो काही महिन्यापूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेत्यांच्या स्टाइलमध्ये भूमिका मांडण्यासाठी घनश्याम राजे दारोडे प्रसिद्ध आहे. वयाच्या अवघ्या १४ वर्षांचा घनश्मचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.घन:श्याम दरोडेचे व्हिडीओ इंटरनेटवरही चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर शेतक-यांच्या प्रश्नांवर बोलणारा घन:श्याम राज्यात लोकप्रिय झाला.आता पुन्हा घन:श्याम दरोडे चर्चेत आला आहे.कारण हाच छोटा पुढारी आता रुपेरी पडद्यावर एंट्री मारत आहे.'मी येतोय' या सिनेमातून छोटा पुढारी लवकरच रुपेरी पडद्यावर झळकत आहे. हा सिनेमा छोटा पुढारी असलेल्या घन:श्याम दरोडेच्या जीवनावर आधारित आहे.असं असलं तरी हा सिनेमा शेतक-यांच्या प्रश्नांवर आधारित आहे. शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या, शेतीमालाला मिळणारा भाव, सावकारी पाश आणि शेतक-यांबाबत सरकारची भूमिका यावर हा सिनेमा बेतला आहे. खुद्द घन:श्याम दरोडे या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या निमित्ताने छोटा पुढारी शेतक-यांचे प्रश्न रुपेरी पडद्यावर मांडणार आहे. शिवाय या सिनेमातून घन:श्याम दरोडेचा जीवनप्रवासही उलगडणार आहे. हा सिनेमा 12 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. मी येतोय, छोटा पुढारी या सिनेमाची काही गाणी देखील रिलीज झाली आहेत. गायक आदर्श शिंदे यांनी काही गाणी गायली आहेत.आता राज्यातल्या शेतक-यांची आणि जनतेची मने जिंकणारा घन:श्याम दरोडे हा सिनेमातूनही रसिकांवर जादू करणार का याकडं सा-यांच्या नजरा लागल्या आहेत.