Join us

या हॉलिवूडपटात पाहायला मिळणार महाराष्ट्राच्या अस्सल लाल मातीचा गंध असलेली 'लावणी'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 13:11 IST

शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान म्हणजे लावणी. महाराष्ट्राच्या अस्सल लाल मातीचा गंध असलेली लावणी. लोकरंजन आणि संस्कृतीची परंपरा लावणीला ...

शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान म्हणजे लावणी. महाराष्ट्राच्या अस्सल लाल मातीचा गंध असलेली लावणी. लोकरंजन आणि संस्कृतीची परंपरा लावणीला लाभली आहे. लावणी या महाराष्ट्राच्या लोककलेने सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले. एकेकाळी सिनेमाचा अविभाज्य भाग असणारी लावणी चित्रपटातून हद्दपार झाली. मात्र नटरंग मुळे पुन्हा एकदा तिला गतवैभव प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले.लावणीबाबत आजच्या पिढीच्या मनात आत्मीयता जागृत व्हावी तसेच सातासमुद्रापर याची महती पोहचावी या संकल्पनेतून हॉलिवूड सिनेमातही ठसकेबाज लावणीचे दर्शन रसिकांना घडणार आहे.राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आता हॉलीवुडमध्येही एक सिनेमा साकारला जाणार आहे. 'स्वॉर्ड्स अँड सेप्टर्स' असं या सिनेमाचं नाव आहे. स्वाती भिसे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. स्वाती भिसे यांची मुलगी देविका भिसे या सिनेमात राणी लक्ष्मीबाईंची मध्यवर्ती भूमिका साकारणार आहेत. यांत हॉलीवुड कलाकार झळकणार असले तरी भारतीय कलाकारांचीही या सिनेमात वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे या हॉलिवुडपटात रसिकांना या सिनेमात लावणीचा ठसका पाहायला मिळणार आहे. मुंबईतल्या आदेश वैद्यने याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे.आदेशने यापूर्वी मालिकांच्या शीर्षकगीतांसाठी आणि सुमारे २५ चित्रपटांसाठी  नृत्य दिग्दर्शन केलं. आता थेट तो हॉलिवूडपर्यंत जाऊन पोहचला आहे.या हॉलिवूड प्रोजेक्टसाठी आदेशने खूप मेहनत घेतली आहे.विशेष म्हणजे ही लावणी लाईव्ह शूट करण्यात आली असं म्हटलं जात आहे.‘स्वॉर्ड्स अँड सेप्टर्स’ या  सिनेमात डेरेक जॅकोबी, नॅथानियल पारकर, रुपर्ट इवरेट या ब्रिटिश कलाकारांसोबतच नागेश भोसले, यतिन कार्येकर, मिलिंद गुणाजी, आरिफ झकारिया आणि अजिंक्य देव हे भारतीय कलाकारसुद्धा पाहायला मिळतील. विशेष म्हणजे यामध्ये अजिंक्य देव तात्या टोपेंची व्यक्तिरेखा साकारणार आहे.हॉलिवुडची अभिनेत्री जोधी मे ही राणी व्हिक्टोरीयाच्या भूमिकेत झळकणार आहे. सुरुवातीला या सिनेमाचं शूटिंग जयपूर आणि जोधपूरमध्ये पार पडणार आहे. जवळपास आठ आठवडे या सिनेमाचं शूटिंग जयपूर-जोधपूरमध्ये होईल आणि त्यानंतर लंडन तसंच मोरक्कोमध्येही सिनेमाच्या काही भागाच्या शूटिंगची योजना आहे. 2018 या वर्षात झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावरील हा हॉलीवुडपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या हॉलीवुडच्या सिनेमात अजिंक्य देव, मिलिंद गुणाजी यांच्यासह इतर भारतीय कलाकारांची निवड होणं ही नक्कीच अभिमानास्पद बाब म्हणावी लागेल.