Join us  

तुम्ही अभिनेता अजिंक्य देव यांच्या पत्नीला पाहिलंत का?, त्यांची लव्हस्टोरी आहे खूप हटके

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 8:21 PM

अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांची पत्नी लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ गाजवलेला आणि 'हिरो' या शब्दाला साजेसा असा चेहरा म्हणजे 'अजिंक्य देव' (Ajinkya Deo). अजिंक्य देव यांनी फक्त मराठी सिनेइंडस्ट्रीतच नाही तर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये काम केले आहे. अजिंक्य देव ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचा धाकटा मुलगा आहे. अजिंक्य देव यांची पत्नी आरती देव लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.

अजिंक्य देव आणि आरती यांची लव्ह स्टोरी खूप हटके आहे. अजिंक्य देव हे पार्ले कॉलेजमध्ये होते. त्यावेळी ते बीएसस्सीच्या पहिल्या वर्षात होते. त्यांच्याच वर्गात आरती देखील शिकत होत्या. आरती यांना पाहताच अजिंक्य देव त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यांचा मित्रांचा एक ग्रूप होता. ते ग्रूपमधून ट्रेकिंगला जात असत. त्यांचे बोलणे वाढले पण जवळीक निर्माण झाली नव्हती.

एक दिवस अजिंक्य यांनी आरती यांना प्रपोज करायचे ठरवले आणि त्यांनी चक्क जुहू बीचवर गाडी आडवी लावून आरती यांना प्रपोज केले. आरती या होकार देतील असे अजिंक्य यांना वाटत होते. पण भलतेच घडले. अजिंक्य यांनी प्रपोज करताच आरती या रडायला लागल्या. त्यामुळे अजिंक्य हेही घाबरले. कारण त्यांनी फक्त प्रपोजच केले होते. त्यानंतर ते दोघे बरेच दिवस बोलत नव्हते. एक दिवस अजिंक्य यांनी हो किंवा नाही हे विचारायचे ठरवले. त्यांनी थेट आरती यांना प्रेमाबद्दल विचारले आणि नकार असेल तर मी आयुष्यातून जातो, असे म्हटले. त्यावर आरती यांनीही होकार दिला. 

कालांतराने त्यांचे प्रेम फुलत गेले. आरतीच्या कुटुंबीयांना दोघांबाबत माहीत झाले. पण अजिंक्य यांची पार्श्वभूमी चित्रपटाशी संबंधित आहे. त्यामुळे ग्लॅमर असलेले अजिंक्य हे आरती यांना नंतर सांभाळतील का, किंवा नंतर फसवतील अशी भीती त्यांना होती. त्यांनी तसे आरती यांना सांगितलेदेखील होते. मात्र त्यांना अजिंक्य देव यांच्यासोबत लग्न करायचे होते. अखेर डिसेंबर १९८६ ला त्यांचा विवाह पार पडला. आता त्यांच्या लग्नाला ३७ वर्षांहून अधिक काळ झाला, त्यांचा सुखाचा संसार सुरु आहे. 

अजिंक्य आणि आरती यांना दोन मुले असून मोठ्या मुलाचे नाव आर्य असून तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून हिंदी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. त्यांना तनया नावाची मुलगी असून ती 'स्पेशल चाइल्ड' आहे. अजिंक्य आणि आरती यांनी 'स्पेशल चाइल्ड'साठी एक शाळा सुरु केली आहे. या माध्यमातून 'स्पेशल चाइल्ड' असलेल्या मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी ते प्रयत्न करत असतात. 

अजिंक्य देव यांनी १९८५ साली अर्धांगिनी चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. दोन वर्षानंतर १९८७ साली त्यांनी सर्जा या चित्रपटात काम केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटामुळे त्यांनी फक्त राष्ट्रीय पुरस्कारच जिंकला नाही तर त्यांचा प्रचंड चाहता वर्ग निर्माण झाला. मराठी सिनेइंडस्ट्रीनंतर त्यांनी बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. २००४ साली आन मेन अॅट वर्क चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आणखी काही चित्रपटात काम केले. शेवटचे ते जय भवानी जय शिवाजी मालिकेत पाहायला मिळाले.   

टॅग्स :अजिंक्य देवरमेश देव