Join us  

"माझ्यासाठी सर्वात कठीण सीन", 'आतुर' चित्रपटातल्या 'त्या' सीनवर बोलल्या प्रीती मल्लापुरकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 11:34 AM

Preeti Mallapurkar : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शित केलेला 'आतुर' हा चित्रपट ३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री प्रीती मल्लापुरकर सोबत केलेली ही बातचीत...

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शित केलेला 'आतुर' (Aatur Movie) हा चित्रपट ३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर ११ ऑक्टोबर रोजी लाँच झाले आणि तो थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासाठी तमाम मराठी चित्रपट रसिक खऱ्या अर्थाने आतुर झाले आहेत. या पोस्टरमध्ये लक्षवेधी ठरतेय ती अभिनेत्री प्रीती मल्लापुरकर (Preeti Mallapurkar) यांची व्यक्तिरेखा! याच व्यक्तिरेखेभोवती चित्रपटाचं कथानक फिरत असणार, हे पोस्टरवरून सहज स्पष्ट होतंय. हीच व्यक्तिरेखा आणि 'आतुर'च्या चित्रीकरणाचा अनुभव याबाबत प्रीती मल्लापुरकर यांच्याशी साधलेला संवाद!

'आतुर'चा अनुभव कसा होता?'आतुर'चा अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. खरंतर दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाकडे काम करण्याची संधी मिळतेय, यावर सुरुवातीचे काही दिवस विश्वासच बसत नव्हता. पण हळूहळू ते सत्यात उतरलं! शिवाजी लोटन पाटील सरांची दिग्दर्शन करण्याची पद्धत वेगळी आहे. ते स्वत: खूप स्पष्ट असतात की त्यांना सीन कसा शूट करायचा आहे. सगळ्यात विशेष म्हणजे ते तुम्हाला स्पष्टपणे सांगतात की एक कलाकार म्हणून तुम्ही तो सीन कसा करायचा आहे. त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या स्टाइलनुसार अभिनय करू देतात.

'आतुर'साठी काही वर्कशॉप्स घेतले होते का? शिवाजी सरांची आणखी एक खासियत म्हणजे हल्ली सगळीकडे प्रचलित असणाऱ्या वर्कशॉप्सवर त्यांचा विश्वास नाही. ते कलाकाराच्या नैसर्गिक अभिनयावर विश्वास ठेवतात. त्यामुळे कलाकारांनाही त्यांच्या नैसर्गिक स्टाइलनुसार अभिनयात सर्वस्व झोकून काम करता येतं.

'आतुर'च्या सेटवरचे वातावरण कसे होते?सेटवरचे वातावरण खूप छान होते. ते मजेशीर होते असे मी म्हणणार नाही. कारण अर्थात, तिथे सगळे काम करायलाच आले होते. त्यामुळे वातावरण पूर्णपणे चित्रपटाशीच निगडित होते. पण, सेटवर तणाव नव्हता. पूर्ण टीम मदत करणारी होती.

तुमच्या सहकलाकारांसोबतचा अनुभव कसा होता? विशेषत: योगेश सोमण?मी त्या सगळ्यांना सेटवरच भेटले. सगळे अनुभवी कलाकार आहेत. पण मला असे कुणी वाटू दिले नाही की मी त्यांच्याएवढी अनुभवी नाहीये. कलाकार म्हणून प्रत्येक कलाकार वेगळाच असतो. पण प्रत्येकाकडून मला काहीतरी शिकायला मिळालं. योगेश सोमण हे तर परफेक्शनिस्ट आहेत.

चिन्मय उदगीरकर, प्रणव रावराणे यांचा सेटवरचा वावर कसा होता? चिन्मय सेटवर एका कोपऱ्यात जाऊन बसायचा. तो शांत आहे, पण आम्ही खूप गप्पा मारल्या. त्याच्या अगदी उलट प्रणव रावराणे..तो सगळ्यात बडबड्या . कदाचित माझ्यापेक्षाही जास्त! माझे प्रणवबरोबर सीन्स नव्हते. पण आम्ही सेटवर भरपूर गप्पा मारल्या.

चित्रीकरणानंतर तुमचा इतर कलाकारांशी संपर्क कसा आहे?खरं सांगायचं तर चित्रीकरण संपल्यापासून आम्ही अजून एकमेकांना भेटलेलो नाही आहोत. पण या सगळ्यांसोबत पुन्हा काम करायला मला नक्कीच आवडेल. मराठी सिनेमा क्षेत्रात आणखीन काही प्रोजेक्ट्स करण्याची माझी इच्छा आहे.

चित्रीकरणावेळी घडलेली काही विशिष्ट आठवण आहे का?विशेष आठवण म्हणजे आमचा एक सीन आम्ही सगळ्यात शेवटी शूट केला होता. त्या सीनमध्ये मला उंचावरून खाली पडायचे होते. तो भाग खूप उंचावर होता. उतारपण चांगलाच तीव्र होता. मी किमान २२-२३ वेळा वरून खाली पडले असेन. तुम्ही प्रत्यक्षात चित्रपटात पाहाल तर तो सीन फक्त काही सेकंदांचाच आहे. देवाच्या कृपेनं त्यात मला काही इजा झाली नाही. पण तो माझ्यासाठी चित्रपटातला सर्वात कठीण सीन होता.

टॅग्स :चिन्मय उद्गगिरकरयोगेश सोमण