Join us  

केतकी नारायणने पहिल्याच सिनेमात दाखवल्या अशा मुव्हज्, सोशल मीडियावर लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 12:19 PM

केतकीची या भूमिकेसाठी निवड झाल्यानंतर काही काळ तिने एक वर्कशॉप केले.

काही दिवसांपूर्वी 'गर्ल्स' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले. 'मुलींची लहर, केला कहर' अशी टॅगलाईन असणाऱ्या या पोस्टरमध्ये पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या 'या' मुली कोण, याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या आणि अखेर हे गुपित उलगडले. 'गर्ल्स'  'मधील 'मती' प्रेक्षकांसमोर आल्यानंतर आता 'मॅगी'सुद्धा प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झाली आहे. केतकी नारायण यात 'मॅगी'ची भूमिका साकारत आहे.

 

खरं तर 'मॅगी' दिग्दर्शकांना सहज सापडली नाही. त्यासाठी त्यांना खूपच मेहनत घ्यावी लागली आणि अथक प्रयत्नानंतर त्यांना केतकीच्या रूपात 'मॅगी' सापडली.  या शोधाबाबत दिग्दर्शक विशाल देवरुखकर सांगतात, ' 'मॅगी'ला शोधण्यासाठी आम्ही जंग जंग पछाडले. तेव्हा कुठे आम्हाला अपेक्षित अशा 'मॅगी'चा शोध लागला.  ज्यावेळी आम्ही 'ही' व्यक्तिरेखा ठरवली त्यावेळी तिचे चित्र आमच्या डोक्यात पक्के होते आणि तशी मुलगी आम्हाला कुठेच सापडत नव्हती. अगदी सोशल मीडियावरही आम्ही तिचा शोध घेतला. अनेक मुली ऑडिशन्ससाठी येऊन गेल्या, तरीही मनासारखी 'मॅगी' मिळतच नव्हती. ही शोधमोहीम सुरु असतानाच कुठूनतरी केतकीचा फोटो समोर आला.  या भूमिकेसाठी केतकीने ऑडिशन दिली आणि आम्हाला आमची 'मॅगी' सापडली.

केतकीची या भूमिकेसाठी निवड झाल्यानंतर काही काळ तिने एक वर्कशॉप केले. तिची आकलन क्षमता अफाट आहे. खरं तर 'बोल्ड' भूमिका दिसायला जितकी सोपी दिसते तितकी ती साकारणे कठीण असते आणि हे आव्हान केतकीने लीलया पेलले. ती 'मॅगी'शी अगदी समरस झाली.'' प्रमुख भूमिका असलेला केतकीचा हा पहिला मराठी चित्रपट असला तरी या आधी केतकीने 'युथ' या मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे. या व्यतिरिक्त तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये, शॉर्ट फिल्म्स मध्येही विविध भूमिका केल्या आहेत.

 'एव्हरेस्ट एंटरटेनमेंट' आणि  'कायरा कुमार क्रिएशन्स' प्रस्तुत 'गर्ल्स' हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत असून 'अ कायरा कुमार क्रिएशन प्रॉडक्शन'च्या अंतर्गत 'गर्ल्स' या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार यांनी केली आहे.  या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले असून अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे.