Join us  

दिग्दर्शक विश्वास जोशी यांचा ‘घ्ये डब्बल’ सिनेमात असणार 'डबल रोल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:42 AM

विशेष म्हणजे ‘शेक्सपिअरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ या जगप्रसिद्ध नाटकावरून प्रेरित असणाऱ्या या सिनेमाचे लेखन हृषीकेश कोळी आणि विश्वास जोशी यांचे आहे.

दिवसेंदिवस सिनेमांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. नवनवीन गोष्टींमुळे सिनेमा अधिकाधिक रसिकांना आकर्षित करण्यात यशस्वी होत आहेत. विशेषतः मराठी सिनेमा प्रगल्भ होत आहे. मराठी सिनेमात निरनिराळ्या गोष्टी दिग्दर्शकांकडून आजमावल्या जात आहेत. त्यामुळं की काय हे सिनेमा रसिकांकडून डोक्यावर घेतले जात आहेत. विविध पुरस्कारांवरही मराठी सिनेमा मोहोर उमटवत आहेत. आता असाच काहीसा प्रयोग दिग्दर्शक विश्वास  जोशी करत आहे. लवकरच ते रसिकांच्या भेटीला   एक नवीन सिनेमा घेऊन येत आहे. ‘What’s up लग्न’  या सिनेमाच्या यशानंतर ‘घ्ये डब्बल’ या आपल्या आगामी मराठी सिनेमातून एक वेगळा विषय ते प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. ‘घ्ये डब्बल’ या हटके शीर्षकामुळे या सिनेमाची खासियत काय असणार? याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज, महेश मांजरेकर आणि नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत गणरायाच्या चरणी या सिनेमाच्या लेखनाची प्रत ठेवण्यात आली. या साऱ्यांच्या शुभेच्छा आणि गणरायाचा कृपाशीर्वाद या चित्रपटाला लाभेल असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी व्यक्त केला आहे. तसेच मराठी सिनेमांमधून वेगळंच समाधान मिळतं असं विश्वास जोशी यांनी स्पष्ट केलं. मराठी सिनेमा हे आशयघन असतात, त्यामुळे नवनव्या गोष्टी आणि प्रयोग करायला आवडतात असंही त्यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे ‘शेक्सपिअरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ या जगप्रसिद्ध नाटकावरून प्रेरित असणाऱ्या या सिनेमाचे लेखन हृषीकेश कोळी आणि विश्वास जोशी यांचे आहे. 

या सिनेमात दोन हिरोंचे डबल रोल असणार आहेत. हे दोन हिरो कोण असणार ? आणि चित्रपटातील इतर कलाकारांची नावे अजूनही गुलदस्त्यात असल्याने ‘घ्ये डब्बल’ सिनेमात नेमकं काय असणार याची उत्सुकता निश्चितच निर्माण झाली आहे. मात्र हा सिनेमा पाहण्यासाठी रसिकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कारण हा सिनेमा २०१९ मध्ये रसिकांचे दिलखुलास मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे. तुर्तास या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख समोर आलेली नसून पुढच्या वर्षी सिनेमा प्रदर्शित होणार इतकीच माहिती देण्यात आली आहे.