Join us  

गश्मीर महाजनीला वडिलांच्या निधनाचे आधीच मिळाले होते संकेत, म्हणाला - "कुजलेल्या मांसाचा वास अन्...."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 7:10 PM

Gashmeer Mahajani : 'चौथा अंक' पुस्तक प्रकाशनावेळी अभिनेता गश्मीर महाजनीने त्याचे वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनादरम्यान घरात घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले.

मराठी कलाविश्वातील हॅण्डसम हंक म्हणून रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani)ओळखले जात होते. मागील वर्षी १५ जुलै रोजी त्यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते घरात मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या निधनाच्या ६ महिन्यानंतर त्यांची पत्नी माधवी महाजनी यांनी 'चौथा अंक' आत्मचरित्र प्रकाशित केले. यात त्यांनी आयुष्यातील चढउतार, चांगल्या-कटू आठवणींबद्दल सांगितले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात पार पडले. त्यावेळी गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) उपस्थित होता. यावेळी त्याने वडिलांच्या निधनादरम्यान घरात त्याला आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले. 

पुस्तकाचे नाव चौथा अंक ठेवण्यामागचे कारण गश्मीरने सांगितले. तो म्हणाला की, पुस्तकाचे नाव काय ठेवायचे, याबद्दल आम्ही सगळे विचार करत होतो. एकदा आई जुन्या कलाकारांचा किस्सा सांगत असताना चौथा अंक असा उल्लेख केला होता. त्यानंतर खूप विचार करून हे नाव फायनल केले. 'चौथा अंक' नाव ठेवले, कारण १२ जुलै, २०२३ रोजी मला माझ्या वॉर्डरोबमधून काहीतरी कुजल्यासारखी दुर्गंधी येत होती. कदाचित ती दुर्गंधी धुवायला टाकलेल्या कपड्यांमुळे येत असेल, असे मला वाटले. पण तो वास कुजलेल्या मांसाचा होता. उंदीर तर मरुन पडला नसेल ना, म्हणून मी आणि माझ्या पत्नीने संपूर्ण वॉर्डरोब हुडकून काढला. मात्र काहीच सापडले नाही.

तोच कुबट वास मला येत होता...

तो पुढे म्हणाला की, त्याच दिवशी दुपारी मी, माझी पत्नी, आई आणि मुलगा व्योम एकत्र जेवलो. भाजी, भाकरी, वरण असं सात्विक जेवण बनवले होते. मात्र जेवणानंतर अचानक आईला उलट्या सुरू झाल्या. त्याच्या महिनाभर आधी आईची शुगर लो झाली होती आणि ती पडली होती. तिच्या डाव्या हाताची तर्जनी खूप सुजली होती. शेवटी मी तिला मुंबईत घेऊन आलो आणि महिनाभरात ती बरी झाली. तिची औषधं सुरू होती, सगळी पथ्य योग्यरित्या ती फॉलो करत होती. त्यामुळे अचानक उलट्या सुरू होण्यामागचे नेमके कारण काय? हेच मला समजत नव्हतं. रात्री मी व्योमला पाहायला बेडरुममध्ये गेलो तेव्हा सुद्धा तोच कुबट वास मला येत होता.

बाबा दरवाजा उघडत नसल्याचे सांगण्यासाठी आला फोन

दुसऱ्या दिवशी मी आईला डॉक्टरकडे घेऊन गेलो, तिच्या उलट्या कमी झाल्या होत्या पण आतड्या पिळवटून निघाल्या होत्या. तिची अवस्था पाहून डॉक्टरदेखील चक्रावून गेले होते. आईला घरी सोडले आणि मी घाईत आवरून एका मिटींगसाठी निघालो. मी घरातील कुबट वासाबद्दल पत्नीला सांगितले. तेव्हा माझ्या लक्षात आले की, तो कुबट वास फक्त मलाच येत होता. त्याच संध्याकाळी मला तळेगावातील सोसायटीमधून मला घर मालकीणीचा फोन आला. त्या म्हणाल्या की, बाबा घराचे दार उघडत नाहीत. मग मी माझ्या पुण्यातील दोन मित्रांना तिथे पाठवले.

कुबट वास हा एक संकेत होता

तासाभरात मित्राने फोन करून सांगितले की, गश्मीर तू लगेच निघ काका दार उघडत नाहीत आणि घरातून वास येतोय. मेल्यानंतर माणूस काय करत असेल? त्यांचा आत्मा आवडत्यांना आशीर्वाद आणि नावडत्यांना शिव्या शाप देत त्यांच्या अवतीभवती घुटमळत असेल का? पण, बाबांचा आत्मा आम्हाला नक्कीच संकेत देत होता. आईला अचानक सुरू झालेल्या उलट्या, वॉर्डरोबमधून येणारा कुबट वास हा एक संकेत होता. बाबांचा आत्मा त्यांची पत्नी व मुलाला सांगत होता… बाबांनो! माझ्या आयुष्यातील चौथा अंक आता संपलाय. आता या आणि मला घेऊन जा. बाबा नाटकाचे प्रयोग संपल्यावर चला आता नाटकाचे तीन अंक संपले…आता चौथा सुरु असे म्हणायचे. त्यामुळेच माझ्या आईने तिच्या आयुष्यातील हा चौथा अंक या पुस्तकरुपी सर्वांसमोर मांडला आहे, असं गश्मीरने पुस्तक प्रकाशावेळी सांगितले.

टॅग्स :रवींद्र महाजनीगश्मिर महाजनी