Join us  

गंभीर प्रश्नांचा हसतखेळत वेध घेणारं भन्नाट लोकनाट्य लवकरच रंगभूमीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 6:47 AM

शेतकरी रोज आत्महत्या करतो. कधी नव्हे तो संपावर जातो. MPSC / UPSC च्या लाखो तरुणांशी सरकार जीवघेणा खेळ करते. ...

शेतकरी रोज आत्महत्या करतो. कधी नव्हे तो संपावर जातो. MPSC / UPSC च्या लाखो तरुणांशी सरकार जीवघेणा खेळ करते. महिलांची टवाळी केली जाते. लाखोंच्या संख्येत तरुण रस्त्यावर उतरतो. महिला रस्त्यावर उतरतात, पण सरकारमध्ये असणारे लोक मात्र थापा मारण्याशिवाय काहीही करत नाहीत. विरोधी पक्षही फारसा गंभीर दिसत नाही.एकंदरीत सर्वत्र अंधारच दिसतोय. सामाजिक प्रलयाच्या ह्या असल्या वेळी युवकांनी कुठं जावं ? शेतकऱ्यानं कुणाच्या तोंडाकडे बघावं ? कौरवांच्या तडाख्यात सापडलेल्या असहाय द्रौपदीनं कुठल्या कृष्णाचा धावा करावा ? विदेशी कंपन्यांच्या घशात जाऊ पाहणाऱ्या आजच्या गोकुळाला कसं वाचवावं ? कुणी वाचवावं ? पांडवांच्या कुळाशी नातं सांगणारेही जर आतून कौरवांनाच मिळालेले असतील, तर मग अभिमन्यूनं चूप राहायचं की काकांच्या विरोधात विद्रोह करायचा ? हया आणि अश्याच स्वरूपाच्या गंभीर प्रश्नांचा हसतखेळत वेध घेणारं कृतिशील नाटक म्हणजेच 'बळीराजाच्या मुला!''सखे साजणी' फेम महाराष्ट्राचे लाडके कवी आणि लोकजागर अभियानाचे प्रणेते प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या लेखणीतून उतरलेलं एक कोरं करकरीत नाटक “बळीराजाच्या मुला !” येत्या ९ मार्च ला रंगभूमीवर येत आहे. मुंबईमधील शिवाजी मंदिर, दादर येथे दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होत आहे. गार्गी मुव्हीज + अर्चना थिएटर्स निर्मित आणि सनीभुषण मुणगेकर दिग्दर्शित 'बळीराजाच्या मुला..!' या लोकनाट्यात गाणी, धमाल डान्स आणि विनोदाचे फटकारे तर असतीलच पण संवेदनशील मनाच्या तारा छेडण्याचीही ताकद आहे. ऑल द बेस्ट फेम सनीभूषण मुणगेकर यांच्यासह विनोद देहेरे, पौर्णिमा शिंदे, संध्या धोंडे, मोनिका चौबळ, अमित चव्हाण, समीर काळबे हया भन्नाट कलाकारांची टीम बळीराजाच्या मुलांचा जागर करण्यासाठी रसिकांच्या सेवेत हजर होत आहे. निर्माता ज्ञानेश वाकुडकर यांनी लिहिलेली आणि मिलिंद इंगळे यांनी संगीत दिलेली सुमधुर गाणी यात आहेत.वृषभ-ओंकार-जयवंत या संगीतकारांनीही नाटकासाठी आपला जीव ओतला आहे.नेपथ्य कनक मंगेश, प्रकाश योजना अजय अणसुरकर यांची असून शेखर दाते हे सुत्रधार आहेत. बळीराजाच्या मुलांनी, विद्यार्थ्यांनी, तरुणांनी आपल्या शेतकरी बापाला वाचवण्यासाठी मैदानात यावं, पुढे होऊन सामाजिक, राजकीय नेतृत्व करावं, असा संदेश देणारं हे एक आगळं वेगळं लोकनाट्य वेगळा इतिहास निर्माण करण्याच्या जिद्दीनं पुढे निघालेलं आहे. सरकार कुणाचंही असो, बळीराजानं नेहमी आत्महत्याच करायची का ? असा थेट सवाल करणारं हे लोकनाट्य रंजन आणि अंजन या दोन्हींचा संगीतमय संगम आहे.