Join us  

'फर्जंद'ने घेतली कोटींची उड्डाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2018 4:12 AM

गेल्या आठवड्याभरात संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेरसिकांना ‘फर्जंद’ या सिनेमाने पछाडलं आहे. सिनेमाचे प्रोमोज पाहून अॅडव्हान्स बुकिंग करणाऱ्या प्रेक्षकांना कधी एकदा ...

गेल्या आठवड्याभरात संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेरसिकांना ‘फर्जंद’ या सिनेमाने पछाडलं आहे. सिनेमाचे प्रोमोज पाहून अॅडव्हान्स बुकिंग करणाऱ्या प्रेक्षकांना कधी एकदा सिनेमागृहात जाऊन ‘फर्जंद’पाहतो असं झालं होतं. गत शुक्रवारी रसिक दरबारी हजेरी लावलेल्या ‘फर्जंद’चं प्रेक्षकांनीही मोठ्या थाटात स्वागत केलं. ओपनिंग शोपासूनच प्रेक्षकांनी ‘फर्जंद’ला गर्दी केली. मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध सिनेमागृहांमध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात ‘फर्जंद’चे हाऊसफुल शो सुरू आहेत.मराठी सिनेसृष्टीतील मान्यवरांपाठोपाठ शुक्रवारपासून प्रेक्षकांनीही ‘फर्जंद’वर स्तुतीसुमनांची उधळण सुरू केल्याने या सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच चांगला व्यवसाय करायला सुरुवात केली. सुरुवातीला तिकीटं न मिळालेल्या सिनेरसिकांना ‘फर्जंद’ न पाहताच निराश होऊन घरी परतावं लागलं. ‘फर्जंद’ पाहून प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे या सिनेमाच्या सकारात्मक प्रचाराला अशी काही सुरुवात झाली की, सिनेमा पाहू न शकलेल्या प्रेक्षकांनी काही ठिकाणी आंदोलनंही केली. त्यामुळे निर्मात्यांना सिनेमाच्या शोजची संख्या वाढवावी लागली.अनिरबान सरकार यांची निर्मिती असलल्या ‘फर्जंद’ची सहनिर्मिती संदीप जाधव, महेश जाऊरकर आणि स्वप्निल पोतदार यांनी केली आहे. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ ची प्रस्तुती असलेल्या ‘फर्जंद’वर प्रीमियर शोपासूनच सकारात्मक प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला होता. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनीही ‘फर्जंद’ पाहिला असून, प्रथमच दिग्दर्शन करणाऱ्या दिग्पाल लांजेकरसह संपूर्ण टिमचं कौतुक केलं आहे. उत्कंठावर्धक कथानक, पटकथेची मुद्देसूद मांडणी, मार्मिक संवाद, कलाकारांचा सुरेख अभिनय, नयनरम्य लोकेशन्स, डोळ्यांचं पारणं फेडणारं व्हिएफएक्स वर्क,शिवकालीन वेशभूषा, सुमधूर संगीत, धडाकेबाज अॅक्शन्स आणि नेत्रसुखद सादरीकरण या कारणांमुळे ‘फर्जंद’ने जणू प्रेक्षकांसोबतच दिग्गजांवरही जणू मोहिनी घातली आहे.‘फर्जंद’च्या प्रमोशनसाठी ठिकठिकाणी भेट देणाऱ्या अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, अजय पूरकर, गणेश यादव आदी कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. पुण्यात काही ठिकाणी तरुण-तरुणींनी अंकितची सिक्स पॅक बॅाडी पाहण्याचा हट्ट धरला. ‘फर्जंद’ बनलेल्या अंकितला आपल्या चाहत्यांचा हट्ट पुरवणं भाग पडलं. या सिनेमाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी मराठी सिनेमाला रिपीट ऑडियन्स मिळाला आहे. तीन दिवसांमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारा ‘फर्जंद’ अल्पावधीतच विक्रमी व्यवसाय करीत नवा इतिहास रचण्याच्या दिशेने झेप घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.