Join us  

'आयुष्यातील प्रत्येक घटना काही कारणास्तव घडते..'; वैदेही परशुरामीची ती पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 6:14 PM

Vaidehi Parshurami : वैदेही परशुरामी नुकतीच 'जग्गू आणि ज्युलिएट' (Jaggu Aani Juliet) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami). वैदेही नुकतीच 'जग्गू आणि ज्युलिएट' (Jaggu Aani Juliet) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यात तिच्यासोबत अमेय वाघ मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान आता वैदेही परशुरामीची पोस्ट चर्चेत आली आहे.

अभिनेत्री वैदेही परशुरामीने महाशिवरात्रीचं औचित्य साधून इंस्टाग्रामवर स्वतःचा फोटो शेअर करत लिहिले की, महाशिवरात्र निमित्त देवभूमीची आठवण! आपल्या आयुष्यातला प्रत्येक प्रवास आपल्याला खूप काही देऊन जातो. तसंच “जग्गु आणि ज्युलिएट” या सिनेमाचा प्रवास देखील मला खूप मोलाचा अनुभव देऊन गेला. कधीच न पाहिलेलं, अनुभवलेलं उत्तराखंड डोळे भरून पाहता, आणि मन भरून अनुभवता आलं. कळत नकळत अनेक माणसं जोडली गेली. काही जवळची माणसं अधिक घट्ट झाली.

तिने पुढे म्हटले की, प्रत्येक दिवस एक नवीन शिकवण, एक नवा अनुभव देऊन गेला. सतत शिकत राहण्याची, उत्तमोत्तम काम करत राहण्याची प्रेरणा देऊन गेला. आपल्या आयुष्यातील सहप्रवासींच्या जीवनात आनंद आणि सकारात्मकता आणत राहण्याची इच्छा निर्माण करून गेला. आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना काही कारणास्तव घडते. आपल्याला ती कारणे कधी कळतात, कधी कळत नाहीत. पण एक मात्र नक्की, जे काही घडतं ते आपल्या भल्या साठीच! या प्रवासातील सर्व सहप्रवासींचे मनःपूर्वक आभार!

वैदेही परशुरामीने या पोस्टमध्ये या चित्रपटाच्या टीममधील सदस्यांचे आभार मानले आहेत. कोळीवाड्याचा लाडका जगदीश उर्फ जग्गू आणि अमेरिकेतल्या चितळ्यांची इंग्रजाळलेली जुलिएट यांची भन्नाट प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. अमेय-वैदेहीसोबतच हृषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, समीर चौगुले, अविनाश नारकर, सुनिल अभ्यंकर, सविता मालपेकर, रेणूका दफ्तरदार, अभिज्ञा भावे, अंगद म्हसकर, जयवंत वाडकर, केयुरी शाह हे कलाकार चित्रपटात झळकले आहेत.
टॅग्स :वैदेही परशुरामीअमेय वाघ