Join us  

मकरंद-क्रांतीच्या ‘ट्रकभर स्वप्नां’चा प्रवास रूपेरी पडद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 5:15 PM

सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराची आपली एक वेगळी इमेज आहे. प्रत्येकजण एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेसाठी ओळखला जातो. पण हेच कलाकार जेव्हा अनपेक्षितपणे ...

सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराची आपली एक वेगळी इमेज आहे. प्रत्येकजण एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेसाठी ओळखला जातो. पण हेच कलाकार जेव्हा अनपेक्षितपणे एखाद्या वेगळ्या भूमिकेत दिसतात तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावतात. नेहमीच वेगळ्या धाटणीचे तसंच आशयघन सिनेमांच्या शोधात असणारे मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडकर हे दोन कलाकारही ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहेत.

अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या प्रमोद पवार यांनी ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात सर्वसामान्य जोडप्याच्या स्वप्नांचा प्रवास उलगडला आहे. मकरंद-क्रांती यांनी या जोडप्याची भूमिका साकारली आहे. मकरंद देशपांडे म्हणजे प्रायोगिक रंगभूमीपासून थेट हिंदी सिनेसृष्टी गाजवलेला प्रयोगशील अभिनेता... अॅक्टर-डिरेक्टर अशी प्रतिमा असलेल्या मकरंदने मराठी-हिंदीसह तेलुगू, कन्नड, मल्याळम आदी दाक्षिणात्य प्रादेशिक भाषांमधील सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. ‘कयामत से कमायत तक’पासून मकरंदचा हिंदी सिनेसृष्टीत सुरू झालेला प्रवास ‘प्रहार’, ‘सर’, ‘सत्या’, ‘फरेब’, ‘मकडी’ अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील सिनेमांनी सजलेला आहे. यात आता ‘ट्रकभर स्वप्न’ या मराठी सिनेमाचाही समावेश झाला आहे. पण या सिनेमातील मकरंदची भूमिका आजवरच्या व्यक्तिरेखांपेक्षा अगदी विरुध्द आहे. मकरंदने या सिनेमात सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे.

या सिनेमात मकरंदच्या जोडीला क्रांती रेडकर ही मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री आहे. ‘सून असावी अशी’ या मराठी सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत दाखल झालेल्या क्रांतीने ‘जत्रा’, ‘लाडी-गोडी’, ‘नो एन्ट्री’ यांसारख्या सुपरहिट मराठी सिनेमांसोबतच प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ मध्येही अभिनय केला आहे. क्रांतीबाबत बोलायचं तर नृत्यात पारंगत असलेली, तसंच कोणत्याही भूमिकेला अचूक न्याय देण्यास सक्षम असलेली अभिनेत्री… असं असलं तरी अद्याप तिने कधीही सर्वसामान्य गृहिणीची भूमिका साकारलेली नव्हती. त्यामुळेच ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमाने एक अनपेक्षित जोडी सादर करीत सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे.

मकरंदने या सिनेमात टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे तर क्रांतीने मकरंदच्या पत्नीच्या भूमिकेत रंग भरले आहेत. दोन मुलं आणि पती-पत्नी अशा चौकोनी कुटुंबाची आणि त्यांच्या स्वप्नांची ही कथा आहे. सर्वसामान्यांची स्वप्न फार मोठी नसतात. आपलं एक घर असावं, मुलं आणि पत्नीसोबत सुखाचे चार क्षण घालवावे, आठवड्याच्या एखाद्या संध्याकाळी चौपाटीवर फेरफटका मारावा आणि सुखाने जीवन जगावं ही सर्वसामान्यांचं स्वप्न. याच स्वप्नांच्या दुनियेत मकरंद आणि क्रांती रमल्याचे ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

‘ट्रकभर स्वप्न’ मध्ये मकरंद आणि क्रांती सोबत मुकेश ऋषी, मनोज जोशी, स्मिता तांबे, आदिती पोहनकर, विजय कदम, आशा शेलार आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. २४ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘ट्रकभर स्वप्नं’ या सिनेमाची पटकथा आणि संवाद प्रवीण तरडे यांनी लिहिले आहेत. या सिनेमाची प्रस्तुती आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि व आदित्य चित्र प्रा. लि यांनी केली आहे. मीना चंद्रकांत देसाई, नयना देसाई या ‘ट्रकभर स्वप्नं’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. संजय खानविलकर या चित्रपटाचे निर्मीती सल्लागार आहेत. ‘पुष्पक फिल्म’ ‘ट्रकभर स्वप्न’ हा  चित्रपट २४ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.