Join us  

'अशी ही बनवाबनवी'मधील लीलाबाई आठवत आहेत ना..? निधनाआधी झाली होती त्यांची वाईट अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 7:00 AM

'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटात लिलाबाई काळभोर ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा यांनी साकारली होती.

अशी ही बनवा बनवी चित्रपट १९८८ साली रिलीज झाला. त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आजही या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. या चित्रपटात लिलाबाई काळभोर ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा यांनी साकारली होती.

अभिनेत्री नयनतारा यांनी अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर अधिराज्य गाजविले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक दमदार चित्रपटात काम केले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आलेले शांतेचे कार्ट चालू आहे या नाटकात लक्ष्मीकांत यांच्या आईची भूमिका नयनतारा यांनी साकारली होती. या नाटकातील नयनतारा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांची ऑनस्क्रीन आई असे देखील म्हटले जात असे. आई पाहिजे, आधार, खुळ्यांचा बाजार, तू सुखकर्ता, धांगडधिंगा, बाळा गाऊ कशी अंगाई यासारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली होती.

नयनतारा यांनी २०१४ साली जगाचा निरोप घेतला. त्यांना निधनाच्या अनेक वर्षं आधीपासून डायबेटीस होता. या आजारामुळे त्या खूप त्रस्त झाल्या होत्या. याच आजारामुळे त्यांच्या निधनाच्या आठ वर्ष आधी त्यांचा डावा पाय शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आला होता. अखेरची काही वर्षं त्या सतत आजारी असल्यामुळे १० वर्षं त्या सिनेइंडस्ट्रीपासून दुरावल्या होत्या. त्यांनी माऊली प्रॉडक्शन, कलावैभव, चंद्रलेखा आणि नाट्यसंपदा या नाट्यसंस्थांच्या नाटकांत भूमिका साकारल्या होत्या. अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील त्यांची भूमिका तर आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. 

टॅग्स :अशी ही बनवाबनवी