Join us  

​मृणाल कुलकर्णी करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 7:05 AM

मृणाल कुलकर्णी यांनी अभिनयाप्रमाणे दिग्दर्शन क्षेत्रातही आपले एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. प्रेम म्हणजे प्रेम असते, रमा माधव ...

मृणाल कुलकर्णी यांनी अभिनयाप्रमाणे दिग्दर्शन क्षेत्रातही आपले एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. प्रेम म्हणजे प्रेम असते, रमा माधव या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली होती. आता या दोन चित्रपटांच्या यशानंतर त्या आणखी एक चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. ती आणि ती असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. या चित्रपटात पुष्कर जोग आणि प्रार्थना बेहरे आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पुष्कर आणि प्रार्थना यांची जोडी पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या सेटला नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भेट दिली होती. त्यांनी या चित्रपटाच्या टीमसोबत फोटो काढले असून हे फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि त्यासोबत एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, अभिनेते पुष्कर जोगमुळे ती आणि ती या चित्रपटाच्या सेटवर जाण्याचा योग आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी करत असल्याने नक्की काही तरी वेगळे पाहायला मिळणार...मृणाल कुलकर्णी यांनी स्वामी या मालिकेद्वारे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच मालिकेतील त्यांच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. लोकांनी त्यांची भूमिका डोक्यावर घेतली असली तरी त्यांना अभिनयात रस नव्हता. त्यांना फिलोसॉफीमध्ये पीएचडी करायची होती. पण स्वामी या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्याने त्यांना अनेक ऑफर येत होत्या. त्यामुळे त्यांनी अभिनयातच करियर करण्याचे ठरवले. श्रीकांत, द ग्रेट मराठी, द्रोपती, हसरते, टीचर, खेल, स्पर्श, सोनपरी यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या. सोनपरी या मालिकेमुळे त्या मोठ्यांप्रमाणे चिमुकल्यांच्या देखील लाडक्या बनल्या. अवंतिका ही त्यांची मालिका तर प्रचंड गाजली होती. त्यांनी थांग, कशाला उद्याची बात, लेकरू, राजकारण यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये तर मेड इन चायना, कुछ मीठा हो जाये, आशिक यांसारख्या हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.