Join us

सुव्रत जोशी ‘शिकारी’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 13:07 IST

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या गाजलेल्या मराठी मालिकेतून नावारूपाला आलेला आणि त्यानंतर ‘अमर फोटो स्टूडीओ’च्या माध्यमातून गुणवान कलाकार म्हणून स्थापित ...

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या गाजलेल्या मराठी मालिकेतून नावारूपाला आलेला आणि त्यानंतर ‘अमर फोटो स्टूडीओ’च्या माध्यमातून गुणवान कलाकार म्हणून स्थापित झालेला सुव्रत जोशी हा महेश मांजरेकर यांचे सादरीकरण असलेल्या आणि विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ या बहुचर्चित मराठी चित्रपटातून पदार्पण करणार आहे. शिकारी या चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत झळकत आहे.  शिकारी या चित्रपटाची बोल्ड पोस्टर्स झळकली आणि या चित्रपटाची चर्चा सुरु झाली. ‘अ लाफ रायट, अ सेक्स कॉमेडी विथ अ मेसेज’ असे ब्रीदवाक्य घेऊन ही पोस्टर्स झळकली आहेत. नेहा खान हिची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहे, तर तेवढीच महत्वाची भूमिका सुव्रतने साकारली आहे. त्याच्यासोबत कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, भाऊ कदम, वैभव मांगले, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाबद्दल मराठी चित्रपट रसिकांमध्ये सध्या फार उत्सुकता लागून राहिली आहे.  नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा (एनएसडी) विद्यार्थी असलेला सुव्रत जोशी हा मुळचा पुण्याचा आहे पण सध्या तो मुंबईत राहतो आहे. अनेक मराठी नाटके आणि एकांकिकांमधून सुव्रतने याआधी भूमिका केल्या आहेत. पुणे विद्यापीठातून पदवी घेतल्यावर त्याने एका प्रख्यात शाळेत एक वर्ष शिक्षकाची नोकरी केली, पण त्याचे खरे वेड अभिनय हेच होते. एनएसडीमधून परतल्यावर त्याला अभिनयाच्या संधी मिळत गेल्या. नॉट इन फोकस, बिनकामाचे संवाद, ड्रीम्स ऑफ तालीम आणि अमर फोटो स्टुडीओ ही त्याने केलेली नाटके.  आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे विजय पाटील हे शिकारी या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि आनंद वैद्यनाथन सहनिर्माते आहेत.सुव्रते सखी गोखले डेटिंग करत असल्याची मध्ये चर्चा होती. सध्या सुव्रत हा एका डान्स रियालिटी शोचं सूत्रसंचालन करत आहे. मात्र बिझी शेड्युलमधून सखी आणि सुव्रत दोघं एकमेंकांसह वेळ घालवत असल्याचे त्यांच्या सोशल मीडियावरील फोटो पाहून दिसून येते. नुकतेच सुव्रतने सखीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.या फोटोला त्याने दिलेली कॅप्शन लक्षवेधी होती.