Join us  

शिव जयंतीच्या मुहूर्तावर उलगडा झालेल्या व्यक्तिरेखेमुळे वाढली 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाबद्दलची उत्कंठा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 3:13 PM

दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील ‘ती’ महत्वपूर्ण व्यक्तिरेखा कोण साकारणार हे समोर आले आहे.

कोरोना संकटाचे मळभ काही प्रमाणात दूर झाल्याने मराठी चित्रपटसृष्टी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मल्टिप्लेक्स सुरू झाले आहेत, परंतु प्रेक्षक संख्या कमी, नवीन चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने चित्रपटगृह चालक चिंतेत आहेत. अशा संकटकाळात शिवजयंतीच्या मुहूर्तावर मराठी चित्रपटसृष्टीला दिलासा देणारी घटना घडली, ती म्हणजे सर्वसामान्य प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्याची क्षमता असलेल्या लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील ‘ती’ महत्वपूर्ण व्यक्तिरेखा कोण साकारणार हे समोर आले. हा भव्य, ऐतिहासिक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या संवेदनशील, सामाजिक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश संपादन केले. यामुळे प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढचा चित्रपट कोणता? याबद्दल रसिकांच्या मानत उत्सुकता होती, तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये कोणते कलाकार, कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसले. शिवजयंतीच्या मुहूर्तावर यातील एका महत्वपूर्ण व्यक्तिरेखेचा उलगडा झाला. मराठीतील हँडसम हंक अभिनेता गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे आज स्पष्ट झाले.

उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित, शेखर मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य, ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण? या प्रश्नाचे उत्तर मिळाले. आता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासह अन्य ऐतिहासिक व्यक्तिरेखा कोण साकारणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

टॅग्स :गश्मिर महाजनी