Join us  

​चिन्मय उद्गिरकर झळकणार धावमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2017 10:28 AM

चिन्मय उद्गिरकर महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिअॅलिटी शोद्वारे अभिनयक्षेत्रात आला. त्यानंतर तो स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत झळकला. या मालिकेतील त्याची ...

चिन्मय उद्गिरकर महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिअॅलिटी शोद्वारे अभिनयक्षेत्रात आला. त्यानंतर तो स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत झळकला. या मालिकेतील त्याची भूमिका प्रचंड गाजली होती. या मालिकेनंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. गेल्या वर्षी तो नांदा सौख्यभरे या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. चिन्मयने मालिकांसोबत चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. वाजलाच पाहिजे या त्याच्या चित्रपटातील भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. तो लवकरच गुलाबजाम या चित्रपटातही झळकणार आहे. त्याचसोबत तो आता धाव या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करत असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट एक बायोपिक असून एका मुसलनाम उद्योगपतीच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात मुसलमान उद्योगपतीची भूमिका चिन्मय साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या खेड येथे सुरू असून चिन्मयचा खूप वेगळा लूक प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. याविषयी चिन्मय सांगतो, "मी माझ्या कारकिर्दीत कधीच मुसलमान व्यक्तिरेखा साकारली नव्हती. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटात मी एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटावर सध्या मी प्रचंड मेहनत घेत आहे. या चित्रपटातील भाषा ही थोडीशी गावाकडची असल्याने संवादावर खूप मेहनत घ्यावी लागत आहे. एका सामान्य माणसाचा एक प्रसिद्ध उद्योगपती बनण्याचा प्रवास प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील माझा लूकदेखील काहीसा वेगळा असणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण खेडसोबतच मुंबईत होणार आहे. तसेच चित्रपटातील काही भागांचे चित्रीकरण म्यानमारमध्येदेखील होणार आहे."