Join us  

Birth Anniversary : दादा कोंडके यांना पचवता आला नाही ‘या’ अभिनेत्रीचा नकार, असा घेतला होता सूड!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 8:00 AM

कॉमेडीचे सम्राट दादा कोंडके यांचा आज वाढदिवस.

ठळक मुद्देदादा कोंडके यांनी उषा चव्हाण यांना ब्रेक दिला होता.

७० आणि ८० चे दशक गाजवणारा एक महान अभिनेता म्हणजे, दादा कोंडके. मराठी चित्रपटसृष्टीचे सुपस्टार असलेल्या या दिग्गज अभिनेत्याचा आज (८ ऑगस्ट) वाढदिवस.  द्विअर्थी संवाद आणि विनोद ही त्यांच्या चित्रपटांची खासियत होती. यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. पण दादा कोंडके यांच्या सिनेमांचा एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग होता. या प्रेक्षकवर्गाने दादा कोंडके यांच्या चित्रपटावर प्रचंड प्रेम केले. १९६९ साली भालजी पेंढारकर यांच्या ‘तांबडी माती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. यानंतर सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या हे त्यांचे चित्रपट तुफान गाजलेत. निर्मिती क्षेत्रही त्यांनी गाजविले. त्यांची निर्मिती असलेला ‘सोंगाट्या’ हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला. यानंतर दादांनी 16 चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे, हे सर्व सिनेमे रौप्यमहोत्सवी ठरले. या विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकातही नोंदले गेले. 

त्यांचे खरे नाव कृष्णा कोंडके होते. मुंबईच्या नायगाव येथील एका मिलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला त्यांचा जन्म झाला आणि त्यांचे नाव कृष्णा ठेवण्यात आले. सिनेसृष्टीत ते दादा नावाने प्रसिद्ध झाले. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले.

दादा कोंडके विवाहित होते. अर्थात जनमानसांत ते अविवाहित म्हणूनच वावरले. पण मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याशी लग्न करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र उषा यांनी या लग्नास नकार दिला. पुढे दादा कोंडके यांनी या नकाराचा सूड उगवला,असे म्हटले जाते. आपल्या बायोग्राफीमध्ये उषा यांच्याबद्दल अनेक वाईट गोष्टी त्यांनी लिहिल्या. खुद्द उषा यांनी ६ ते ७ वर्षांपूर्वी  एक ब्लॉग लिहून याचा खुलासा केला होता. ‘हे पुस्तक प्रकाशित होणे हा आयुष्यातील सगळ्यांत कठीण काळ होता’, असे उषा यांनी म्हटले होते. 

दादांनी ‘एकटा जीव’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकात उषा चव्हाण यांच्यासह अनेक कालावंतांबद्दल बरेच काही बरेवाईट लिहिले गेले. खुद्द दादांना हे पुस्तक प्रकाशित करायचे नव्हते परंतु त्यांच्या मृत्यूनंतर हे पुस्तक प्रकाशित झाले. यानंतर या पुस्तकावर प्रचंड वाद झाला अखेर  पुस्तकावर लगेचच बंदी घातली गेली. याचा खुलासा उषा चव्हाण यांनी सहा ते सात वषार्नंतर आपल्या ब्लॉगवरुन केला होता.  या पुस्तकाद्वारे उषा यांची बदनामी झाली. त्यामुळे सिने सृष्टीपासून त्यांनी दूर राहणेच पसंत केले. उषा चव्हाण यांनी यानंतर दत्तात्रय कडू देशमुख यांच्यासोबत संसार थाटला. आणि पुण्यात स्थायिक झाल्या.  

दादा कोंडके यांनी उषा चव्हाण यांना ब्रेक दिला होता. ‘सोंगाड्या’ या चित्रपटासाठी त्यांना अभिनेत्रीची गरज होती. त्यावेळी सातारा बसस्थानकाजवळ दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची पहिली भेट झाली होती. तेव्हा दादांनी उषा यांची निवड केली आणि त्यांना पहिला ब्रेक मिळाला.  

टॅग्स :दादा कोंडके