Join us  

मोठया पडद्यावर ‘लगी तो छगी’ मारणार षटकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 8:10 AM

सिने आणि क्रिकेट विश्वाचे संबंध फार जवळचे आहेत. वास्तवाइतकंच पडद्यावरही हे नातं अधिक घट्ट आहे. त्यामुळे बऱ्याच दिग्दर्शकांना क्रिकेटशी ...

सिने आणि क्रिकेट विश्वाचे संबंध फार जवळचे आहेत. वास्तवाइतकंच पडद्यावरही हे नातं अधिक घट्ट आहे. त्यामुळे बऱ्याच दिग्दर्शकांना क्रिकेटशी निगडीत असलेलं सिनेमाचं शीर्षक ठेवण्याचा मोह आवरता येत नाही. दिग्दर्शक शिवदर्शन साबळेंचा  ‘लगी तो छगी’ हा आगामी मराठी सिनेमा याला अपवाद नाही. मुंबईच्या लोकल भाषेतील ‘छगी’ म्हणजे ‘षटकार’ मारीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सस्पेन्स-थ्रीलर-कॉमेडी असल्याने ‘लगी तो छगी’चा आशय आणि विषय गुलदस्त्यातच ठेवणं सिनेमाच्या टिमने पसंत केलं आहे. प्रेक्षकांना सिनेमागृहात गेल्यावरच थेट या सिनेमाचा विषय समजावा असं ‘लगी तो छगी’च्या टिमचं मत आहे. आश्चर्याचा धक्का देणारं कथानक, त्यातील ट्विस्ट अँड टर्न्स, पटकथेतील वळणं काही ठिकाणी प्रेक्षकांना हसवतील, तर काही ठिकाणी अंतर्मुख होऊन विचार करायलाही भाग पाडतील.अभिजीत साटमने या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. त्याच्या जोडीला निकीता गिरीधर, रविंदरसिंग बक्षी, मिलिंद उके, योगेश सोमण, असित रेडीज, शैला काणेकर, राजू बावडेकर, सागर आठलेकर, महेश सुभेदार, अक्षय भोसले आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.शिबूला कायम वेगळया वाटेने जाणाऱ्या पटकथांनी आकर्षित केलं आहे. सिनेमाच्या माध्यमातून केवळ  मनोरंजन न करता कायम त्याद्वारे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न त्याने केला आहे.‘लगी तो छगी’ हा सिनेमासुद्धा त्याच प्रकारचा असल्याचं सांगत शिबू म्हणाला की, हा कॉमेडी-सस्पेन्स-थ्रीलर आहे. थ्रील हे सिनेमाचं अविभाज्य अंग आहे. सिनेमा कोणत्याही प्रकारचा असला तरी पटकथेत थ्रील असणं गरजेचं असतं. या सिनेमाची कथा तशाच प्रकारची असल्याने रसिकांना शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चाला खिळवून ठेवण्यात यशस्वी होईल असंही शिबू मानतो.