Join us

​भिकारी चित्रपटाच्या टीमने दिली लोकमत ऑफिसला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 16:06 IST

गणेश आचार्य दिग्दर्शित 'भिकारी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट आई आणि मुलाच्या जीवनावर भाष्य करणारा आहे. ...

गणेश आचार्य दिग्दर्शित 'भिकारी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट आई आणि मुलाच्या जीवनावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटातील 'देवा हो देवा' हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. हे गाणे सुखविंदर सिंग यांनी गायले आहे. या गाण्यात ५०० ज्युनिअर कलाकार आणि २०० म्युझिशियन आहेत. तसेच अजय गोगावले यांच्या आवाजातील काळजाला स्पर्श करून जाणारे 'मागू कसा मी' या गाण्यांनी प्रेक्षकांना भारावून टाकले आहे.  या चित्रपटाच्या टीमने नुकतीच लोकमतच्या ऑफिसला भेट दिली. यावेळी  बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक गणेश आचार्य म्हणाले, "मराठीमध्ये पदार्पण करण्यासाठी मला विषय हवा होता आणि मला तो विषय मिळाला. या चित्रपटामध्ये आई आणि मुलाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, यावरून आम्ही सिनेमाचे नाव ठेवले. हा चित्रपट म्हणजे अ‍ॅक्शन, इमोशन्स, कॉमेडी, रोमान्सचे पूर्ण पॅकेज आहे. चित्रपटामध्ये 'बाळा' म्हणून एक गाणे आहे ज्यामध्ये  स्वप्निलचा हिप हॉप डान्स बघायला मिळणार आहे." यावेळी बोलताना अभिनेता स्वप्निल जोशी सांगतो, "या चित्रपटातील भूमिका माझ्या खऱ्या आयुष्यातील व्यक्तिरेखेपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. चॉकलेट बॉय ही इमेज, रोमँटिक टॅग हा प्रेक्षकांनी मला दिला आणि मी त्याचा प्रचंड आदर करतो. कारण आधी कुठली तरी इमेज बनवण्यासाठी मेहनत करायची आणि ती बनल्यावर प्रेक्षकांना विसरून जायचे हे मुळात मला मान्यच नाही. मी ऋणी आहे रसिक प्रेक्षकांचा की त्यांनी मला चॉकलेट हिरो म्हणून संबोधले. भिकारी ही एक वृत्ती आहे. अनेक लोक विचारांनी भिकारी आहेत, कोणाकडे भाषेचे दारिद्र्य आहे तर कोणाकडे वर्तनाचे. प्रत्येकजणच काही ना काही तरी मागत असतो केवळ प्रत्येकाच्या वाडग्याचा आकार वेगवेगळा असतो. कोणी दोन रुपये मागतो तर कोणी दोनशे कोटी मागतो. त्यामुळे जर विचार केला तर आपण सर्वच भिकारी आहोत. आजपर्यंत खूप वाचलंय की, आईने मुलासाठी बलिदान दिले किंवा मुलाने आईसाठी बलिदान दिले. या चित्रपटामध्ये एक वेगळेपणा आहे. सम्राट जयकर हा जन्मत: भिकारी नाही. तो करोडपती, देखणा, श्रीमंत, रूबाबदार आहे. परिस्थिती त्याला कशी भिकारी बनायला लावते. हे प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहे."  दिग्दर्शक गणेश आचार्य सांगतात, "हा सिनेमा बघितल्यानंतर कोणी भिकारी तुमच्याकडे भीक मागायला आले तर एक सेकंद तुम्हाला त्याची कथा जाणून घ्यावीशी नक्कीच वाटेल. चित्रपटाच्या ट्रेलरच्या शेवटी एक वाक्य आहे, कोणी मुद्दाम नाही जगत असं... प्रत्येकाचा नाईलाज असतो, याची प्रचिती तुम्हाला हा चित्रपट पाहाताना नक्कीच येईल." या चित्रपटाचे निर्माते शरद शेलार आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेत्री ऋचा इनामदार मधुच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, किर्ती आडरकर, गुरू ठाकूर, सुनील पाल ही स्टार कास्ट बघायला मिळणार आहे. गुरू ठाकूर यांनी चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले असून गीतलेखनही केले आहे. विशाल मिश्रा यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.  Also Read : अभिनेता आणि माणूस म्हणून भिकारी या चित्रपटाने मला श्रीमंत केलेः स्वप्निल जोशी