Join us  

अखेर कर्करोगाशी झुंज संपली, 'सही रे सही' फेम अभिनेत्री गीतांजली कांबळी कालवश

By तेजल गावडे | Published: October 24, 2020 1:36 PM

गीतांजली कांबळी यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. आज पहाटे त्यांचे मुंबईमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले.

२०२० वर्षांत एकानंतर एक मनोरंजन विश्वातील धक्कादायक आणि दुःखद वृत्त समोर येत आहेत. दरम्यान आज मनोरंजनसृष्टीने आणखीन एक कलाकार हरपला आहे. सही रे सही फेम अभिनेत्री गीतांजली कांबळी यांची गेल्या काही काळापासून कर्करोगाशी असलेली झुंज अखेर संपली आहे. आज पहाटे त्यांचे मुंबईतील चर्नी रोड येथील सैफी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

गीतांजली कांबळी यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. आज पहाटे त्यांचे मुंबईमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. गीतांजली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथल्या होत्या. मुंबईत त्या कामानिमित्त आल्या होत्या. याठिकाणी त्यांनी त्यांची अशी ओळख मिळवली होती.  मात्र त्यांना या काळात कर्करोगाने ग्रासले होते, गेला काही काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०१२ सालापासून त्या कर्करोगाचा सामना करत होत्या. त्यांची आर्थिक परिस्थितीही अगदी बेताची होती. आयुष्यभर त्यांनी मालवणी नाट्यक्षेत्रासाठी काम केले. कोरोना काळातील लॉकडाऊनध्ये नाटकांचे दौरे बंद असल्याने त्यांच्यासमोरील संकट आणखी वाढले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी मदतीचे आवाहन देखील केले होते. त्यांच्या या संपूर्ण प्रवासात गीतांजली यांचे पती लवराज कांबळी त्यांच्याबरोबर होते.केदार जाधव दिग्दर्शित 'सही रे सही' या नाटकात अभिनेता भरत जाधवबरोबर गीतांजली कांबळी यांनी केलेला अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच मालवणी नटसम्राट दिवंगत मच्छिंद्र कांबळी यांच्या 'वस्त्रहरण' नाटकातही त्यांची भूमिका गाजली होती.  गीतांजली यांनी ५० हून अधिक व्यावसायिक नाटकात अभिनय केला आहे. 'बकुळा नामदेव घोटाळे', 'टाटा बिर्ला', 'गलगले निघाले' या चित्रपटातही त्यांनी काम केले होते.

टॅग्स :भरत जाधव