Join us

वडील मुलीच्या अनोख्या नात्याची जाणीव करून देणारा "अस्तु"!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 12:12 IST

आजवर अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सव, राष्ट्रीय पुरस्कारांसह तब्बल २७ पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविणारा  ‘अस्तु’ हा चित्रपट १५ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात ...

आजवर अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सव, राष्ट्रीय पुरस्कारांसह तब्बल २७ पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविणारा  ‘अस्तु’ हा चित्रपट १५ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

संस्कृत स्कॉलर असलेल्या चक्रपाणी शास्त्री यांना उतारवयात स्मृतीभंशा (अल्झायमर) चा विकार होतो. वर्तमानाचा हात सोडून ते दुसर्‍याच गोष्टीत रमू लागतात.त्यातून मग सुरु होते ती, त्या व्यक्तीचा सांभाळ करणार्‍या कुटुंबाची कुचंबणा. वडील आणि मुलीचे असणारे अनोखे नाते हे या चित्रपटात उत्तमरित्या मांडण्यात आले आहे.

        डॉ. मोहन आगाशे यांनी साकारलेल्या अप्पांच्या व्यक्तिरेखेचं विशेष कौतुक करण्यात आलं होतं तर माहुताच्या बायकोची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारलेल्या अभिनेत्री अमृता सुभाषला या व्यक्तिरेखेसाठी राष्ट्रीय पुरस्कारदेखील प्राप्त झाला आहे.  तसेच चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे,  अभिनेत्री अमृता सुभाष यांच्यासह इरावती हर्षे, देविका दफ्तरदार आणि मिलिंद सोमण आदी कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

गौरिका फिल्म्सच्या शीला राव व डॉ. मोहन आगाशे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

“यापूर्वी हा चित्रपट मर्यादित स्वरुपात प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, आता व्यापक पद्धतीनं ही कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्यासाठी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला असून प्रेक्षकांनाही हा चित्रपट नक्कीच आवडेल”,  असं निर्मात्या शीला राव यांनी सांगितलं.

चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी केलं असून, संगीत दिग्दर्शन धनंजय खरवंदिकर व साकेत कानेटकर यांनी केलं आहे.  वडील मुलीच्या अनोख्या नात्याची जाणीव करून देणारा "अस्तु" १५ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.