Join us  

अशी आहे आणि...डॉ.काशिनाथ घाणेकर सिनेमाची दुसरी झलक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 7:24 PM

सशक्त व्यक्तिमत्व असलेल्या डॉ.काशिनाथ घाणेकरांची भूमिका पडद्यावर साकारत आहे अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे. सुबोध भावे मराठीच्या पहिल्या सुपरस्टारची भूमिका साकारण्यासाठी अतिशय उत्सुक आहे.

डॉ.काशिनाथ घाणेकर’या सिनेमाद्वारे. या सिनेमाची पहिली झलक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आली आणि आज सोशल मिडीयाद्वारे त्याची दुसरी झलक प्रदर्शित झाली आहे. सशक्त व्यक्तिमत्व असलेल्या डॉ.काशिनाथ घाणेकरांची भूमिका पडद्यावर साकारत आहे अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे. सुबोध भावे मराठीच्या पहिल्या सुपरस्टारची भूमिका साकारण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी लहानपणापासून रंगभूमी काम करणाऱ्या अनेक कलाकारांविषयी ऐकत आलो आहे, परंतु मला रंगभूमीमध्ये जास्त रस नव्हता, त्यामुळे मी त्यांची काम पाहू शकलो नाही... परंतु त्यांच्या विषयी मला विलक्षण आदर मनामध्ये होता. या सर्वांचे काम मी बघू शकलो नाही याची खंत मला आयुष्यभर मनामध्ये राहील. या सिनेमाच्या निमित्ताने, मला डॉ.काशिनाथ घाणेकर आणि त्यांचे काम जाणून घेता आले. या चित्रपटामध्ये काम केल्यामुळे मला मराठी रंगभूमीवर परत आल्यासारखे वाटत आहे.”

१९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या “आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर” मध्ये या अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे, त्यांनी मराठी रंगभूमीचा चेहेरामोहरा नाट्यमय रीत्या बदलून टाकला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे. प्रेक्षकांच्या शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जगणाऱ्या रंगभूमीच्या सम्राटाचे आयुष्य येत्या दिवाळीत म्हणजेच ७ नोव्हेंबर रोजी मोठया पडद्यावर उलगडणार...२०१८ च्या आरशात रंगभूमीच्या सुवर्णकाळाचा मागोवा.

ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाउसफुल्लचे बोर्ड लागत होते... ज्या नावाने मराठी रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती असे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रुपेरी पडद्यावर आपल्या भेटीला येणार आहेत. मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले, अनेक तरुण अभिनेत्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले. प्रभावशाली संवादफेक, जरब बसणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली अद्वितीय होती.

'रायगडाला जेव्हा जाग येते','इथे ओशाळला मृत्यू','अश्रूंची झाली फुले', 'गारंबीचा बापू', 'आनंदी गोपाळ', 'शितू', 'तुझे आहे तुजपाशी', 'सुंदर मी होणार', 'मधुमंजिरी' या आणि अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या. या महान अभिनेत्याला वायकॉम18 मोशन पिक्चर्स दिवाळीच्या शुभमुहूर्तावर “आणि .... काशिनाथ घाणेकर” या  सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. 

टॅग्स :सुबोध भावे