Join us  

अक्षय कुमारच्या ‘चुंबक’सिनेमाचा टीझर आणि पोस्टर तुम्ही पाहिले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 4:12 PM

सोलापूरमधील एका छोट्या गावातील गतिमंद आणि सरळसाध्या अशा व्यक्तीची ही भूमिका आहे. स्वानंद अगदी पहिल्यांदाच चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारात आहेत.

बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार प्रस्तुत करत असलेला पहिला चित्रपट म्हणून मराठी चित्रपट ‘चुंबक’चा सध्या बोलबाला असून या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर गुरुवारी २८ जून रोजी प्रकाशित करण्यात आले. या पोस्टरमध्ये चित्रपटातील तीन प्रमुख व्यक्तिरेखा प्रभावीपणे रेखाटल्या गेल्या आहेत. चित्रपटाचे हे नायक मुंबईत भारतीय रिझर्व बँकेच्या कार्यालयाच्या बाहेर एका विचित्र परिस्थितीत कसे अडकतात त्याचे अधोरेखन या पोस्टरमध्ये आहे. ‘दुष्कृत्यांचा शहेनशाह’ असे ज्याला संबोधले जाते तो मोबाइल मॅकेनिक ‘डिस्को’, हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारा पण ज्याला ‘गव्हर्नरचा असिस्टंट’ संबोधले जाते असा ‘बाळू’, गबाळा दिसणारा आणि दुष्कृत्यांना नाहक बळी पडणारा स्वानंद किरकिरे यांनी साकारलेला ‘प्रसन्ना’ हे या पोस्टरवर आहेत. पोस्टर मनाला भिडणारे आणि तेवढेच प्रभावी झाले आहे. संदीप मोदींनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा टीझरही प्रकाशित करण्यात आला. तोसुद्धा खिळवून ठेवणारा आहे. स्वानंद किरकिरेंचा प्रसन्ना, साहिल जाधवचा बाळू यांच्यातील बसमधून प्रवास करत असताना खिडकीजवळील जागा पटकावण्यासाठी झालेली ‘चकमक’ या टीझरमध्ये प्रभावीपणे दिसते.

 

बॉलीवूडमधील आघाडीचा सुपरस्टार अक्षय कुमारने सामाजिक माध्यमांचा आधार घेत शुद्ध मराठीत एक घोषणा केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत हलचल माजली आहे. अक्षयने एक व्हिडीओ प्रकाशित करून ‘चुंबक’ या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाची निर्मिती तो स्वतः करत असल्याची घोषणा केली होती. चित्रपटाची निर्मिती अरुणा भाटीया आणि नरेन कुमार करत असून कायरा कुमार क्रीएशन्स प्रोडक्शनचा चित्रपट आहे. नुकतीच चित्रपटातील तीन प्रमुख व्यक्तिरेखांची पहिली झलक प्रकाशित केली. त्यातील पहिली महत्वाची व्यक्तिरेखा आहे, प्रसन्ना ठोंबरेची. दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या आणि आघाडीचे गीतकार, संगीत दिग्दर्शक, गायक आणि लेखक असलेल्या स्वानंद किरकिरे यांनी ही भूमिका साकारली आहे. सोलापूरमधील एका छोट्या गावातील गतिमंद आणि सरळसाध्या अशा व्यक्तीची ही भूमिका आहे. स्वानंद अगदी पहिल्यांदाच चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारात आहेत.प्रसन्नाबरोबर दुसरे पोस्टर आहे ते ‘डिस्को’ची भूमिका साकारणाऱ्या संग्राम देसाईचे. परराज्यातून आलेल्या आणि मुंबई मोबईल रिपेरिंगचे काम करणाऱ्या तरुणाची ही व्यक्तिरेखा आहे. परराज्यातून आलेल्या पण हुशार अशा मोबाइल मेकॅनिकची भूमिका साकारण्यासाठी संग्रामला शहरातील व्यक्तिरेखांचा अभ्यास करावा लागला. या व्यक्तिरेखेचा अभ्यास करताना संग्रामने मोबाईल दुरुस्त करण्याचे थोडेबहुत प्रशिक्षणही घेतले.‘बाळू’ या चित्रपटातील तीन मुख्य या व्यक्तिरेखांपैकी एक महत्वाचे पात्र. या व्यक्तिरेखेचे पोस्टर सर्वात आधी दोन आठवड्यांपूर्वी प्रकाशित करण्यात आले. ही व्यक्तिरेखा चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या पुणे येथील साहिल जाधवने साकारली आहे. तो आपले एक छोटेसे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतो आहे. आपल्याकडून व्यक्तिरेखेला पुरेपूर न्याय मिळावा म्हणून त्याने रेस्टॉरंटमध्ये काम केले आणि तेथील वेटर्सबरोबर तो काही दिवस राहीलाही.अक्षय कुमारचा निर्मिती असलेला ‘चुंबक’ २७ जुलै २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.