Join us  

लक्ष्मीकांत बेर्डेच्या या सहकलाकाराला मिळत नाहीये काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:39 AM

एकेकाळी बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या भूमिका गाजवलेले अनेक कलाकार सध्या लाइमलाइटपासून दूर आहेत. काही कलाकार आता कुठे आहेत, ते काय करतात हे देखील आपल्याला माहीत नाही.

बॉलिवूडमध्ये तुम्हाला कधी यश मिळेल आणि कधी तुम्हाला अपयश चाखावे लागेल हे सांगू शकत नाही. एकेकाळी बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या भूमिका गाजवलेले अनेक कलाकार सध्या लाइमलाइटपासून दूर आहेत. काही कलाकार आता कुठे आहेत, ते काय करतात हे देखील आपल्याला माहीत नाही. दिपक शिर्के हे त्यामधीलच एक नाव. 

‘एक शून्य शून्य’ या मालिकेतील दीपक शिर्के आजही प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात आहेत. मराठी मालिकेसोबतच १०० हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमात दीपक शिर्के यांनी काम केले आहे. धडाकेबाज सिनेमातील बाप्पा ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. दीपक शिर्के यांची खरी चर्चा झाली ती त्यांच्या निगेटिव्ह भूमिकांमुळे. हिंदीमधील दिग्गज कलाकारांसह स्क्रीन शेअर करण्याचा मान दीपक शिर्के यांना मिळाला आहे. या दिग्गज कलाकारांच्या तोडीस तोड अभिनयाने त्यांनी आपली एक वेगळी छाप पाडली. त्यांची प्रत्येक भूमिका आजही रसिकांच्या काळजात घर करून आहे. 'तिरंगा' सिनेमातील गेंडास्वामी, 'अग्निपथ' सिनेमातील अण्णा शेट्टी यांनी मोठ्या खुबीने रंगवला. बिग बी अमिताभ यांच्यासोबतची अग्निपथ सिनेमातील चिखलातली हाणामारी तर कुणीच विसरू शकत नाही. नव्वदीच्या दशकातील बहुतांशी सिनेमात दीपक शिर्के असायचे. हम, खुदा गवाह, सरकार अशा विविध सिनेमांत दीपक शिर्के यांनी बिग बींसह स्क्रीन शेअर केली. यानंतर इश्क, टारझन – द वंडर कार, भाई, लोहा अशा एकाहून एक सरस सिनेमात त्यांनी भूमिका साकारल्या. झपाटलेला 2 सिनेमात हनम्या ही भूमिका त्यांनी साकारली. गेल्या वर्षी 'व्हेंटिलेटर' या सिनेमात आत्मा धाडके ही भूमिका दीपक शिर्के यांनी साकारली होती. मध्यंतरीच्या काळात काही काळ सीआयडी या लोकप्रिय मालिकेत एसीपी प्रद्युम्नच्या जागी त्यांची वर्णी लागली होती. काही बी ग्रेड सिनेमातही त्यांनी काम केलं. इतके वर्षं चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतरही पुरस्कार सोहळे, रिअॅलिटी शोमध्ये दीपक शिर्के पाहायला मिळत नाहीत.कोणत्या कार्यक्रमातील उपस्थिती किंवा त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याचं ऐकीवात येत नाही. तसंच त्यांच्या आगामी सिनेमाचीही काहीच चर्चा होताना सध्या दिसत नाही. त्यामुळे चित्रपटसृष्टी लाडक्या एक शून्य शून्य हवालदाराला, सुपरहिट प्रलयनाथ म्हणजेच दीपक शिर्के यांना विसरत तर चालली नाही ना अशा चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.    

दीपक शिर्के यांना आजही लोक अण्णा शेट्टी अथवा गेंडास्वामी या नावानेच ओळखतात. तिरंगा या चित्रपटातील त्यांच्या गेंडास्वामी या भूमिकेच्या नावाची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटात खरं तर त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव गुंडास्वामी होते. पण या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या राजकुमार यांनी संवाद म्हणताना गुंडास्वामी असा उल्लेख न करता गेंडास्वामी असा उल्लेख केला. चित्रपटाच्या टीमला हे नाव खूपच आवडले आणि त्यामुळे त्यांच्या पात्राचे नाव गुंडास्वामी ऐवजी गेंडास्वामी ठेवायचे ठरले.