Join us  

तब्बल आठ वर्षानंतर 'अगडबम'ची नाजुका परतली,असा असणार तिचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 2:37 PM

ही व्यक्ती नेमकी कोण आहे हे समजून येत नसल्यामुळे, हा टीझर पोस्टर रसिकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे. 

गेल्या ८ वर्षापूर्वी मराठी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'अगडबम' सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 'अगडबम' सिनेमातून रसिकांना वेगळ्या स्टाईलमध्ये तृप्ती भोईरचा वेगळा अंदाज रसिकांना या सिनेमात पाहायला मिळाला होता. पुरुषांच्या जंगलात स्वतःचं बाईपण जपणारी व्यक्तीरेखा तिनं साकारली होती. आता पुन्हा एकदा या सिनेमातील सर्वांची लाडकी 'नाजुका' पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'माझा अगडबम' या सिनेमाद्वारे झळकणार आहे. अभिनेत्री तृप्ती भोईरने गाजवलेल्या या पात्राचे आजही विशेष कौतुक केले जात असून, 'माझा अगडबम' मध्ये ती यापेक्षाही आणखी वेगळ्या दमदार भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. कारण, या सिनेमाच्या प्रमुख भूमिकेबरोबरच लेखिका. दिग्दर्शिका, निर्माती अशा त्रीसुत्री भूमिकेतही ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

या सिनेमाची पुढील भागाची घोषणा झाल्यापासून, चाहते उत्सुकतेने या भागाच्या प्रतीक्षेत आहेत. गृहिणीची भूमिका साकारत तृप्ती भोईर व तिच्या पतीची भूमिकेत सुबोध भावे, या सिनेमातून रसिकांना पुन्हा एक सुखद आणि भावनिक सफारीचा अनुभव देतील. या सिनेमाची कथा एक मुलगी, सून, व बायको म्हणून तिच्याकडून असणाऱ्या अपेक्षांना पतीच्या पाठींब्यासह सामोरी जाणाऱ्या नायिकेच्या विविध अडचणी आणि विनोदाची सफर घडवते. एका अलौकिक विनोदाची झालर असणारी ही कथा दिग्दर्शिका तृप्ती भोईर या चित्रपटातून मांडत आहेत.

येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात, नाजुकाचा पती म्हणजेच रायबाच्या भूमिकेत, मराठीचा सुपरस्टार अभिनेता सुबोध भावे दिसणार आहे. त्यामुळे,अभिनयात वैविध्यपण जपणाऱ्या सुबोधचा एक नवा अंदाज आपल्याला या सिनेमातपाहायला मिळणार आहे. 

मनोरंजनाची वजनदार मेजवानी देणाऱ्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरपोस्टरवर पाठमोरी उभी असलेली एक लढवय्या व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र ही व्यक्ती नेमकी कोण आहे हे समजून येत नसल्यामुळे, हा टीझर पोस्टर रसिकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे. 

सुपरहिट 'अगडबम' च्या या दमदार सिक्वेलच्या सादरीकरणाची फळीदेखील तितकीच दमदार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले चित्रपटनिर्माते आणि वितरक जयंतीलाल गडा यांची पेन इंडिया लिमिटेड कंपनी प्रथमच प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. शिवाय, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा यांनी तृप्तीसह सिनेमाच्या निर्मात्यांची धुरा सांभाळली असून, रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी सहनिर्मात्यांची  जबाबदारी स्वीकारली आहे.