Join us

​अभय महाजन आणि प्रिया बापटच्या 'गच्ची' सिनेमाचे टीझर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 14:14 IST

'गच्ची'... म्हणजे वाढत्या शहरीकरणातील टुमदार इमारतीवर वसलेली एक निवांत जागा. या जागेत काही घटका शांत बसून, आयुष्याचा मार्ग चोखाळता ...

'गच्ची'... म्हणजे वाढत्या शहरीकरणातील टुमदार इमारतीवर वसलेली एक निवांत जागा. या जागेत काही घटका शांत बसून, आयुष्याचा मार्ग चोखाळता येतो. म्हणूनच तर सुख असो वा दुःख, मानवी भावभावनांना वाट करून देणारी ही 'गच्ची' प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. हीच 'गच्ची' आता सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्राॅडक्शन्स निर्मित 'गच्ची' हा सिनेमा येत्या २२ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर एका हटके अंदाजात टीझर लाँच करण्यात आला. या टीझरची सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलीच चर्चा आहे. प्रेक्षकांना हा टीझर आवडत असल्याचे ते त्यांच्या प्रतिक्रियांद्वारे सांगत आहेत. नचिकेत सामंत दिग्दर्शित गच्ची या सिनेमातील मुख्य कलाकार अभय महाजन आणि प्रिया बापटच्या डिजिटल वॉरमधून या चित्रपटाचे टीझर लाँच करण्यात आले. या टीझरमध्ये अभय आणि प्रिया दिसत असून,गच्चीवर घडणारा हा सिनेमा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. प्रियाचा एक वेगळा अंदाज यात पाहायला मिळतो आहे. तसेच संपूर्ण सिनेमा याच दोघांवर आधारित असल्याची जाणीव हा टीझर पाहताना होते. या टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाचे कुतूहल अधिक वाढलेले दिसून येत आहे. योगेश विनायक जोशी लिखित गच्चीवरील ही गोष्ट नेमकी काय आहे, ही जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांना लागली  असेल, यात शंका नाही.   प्रिया बापट आता मुक्ता बर्वेसोबत ‘आम्ही दोघी’ या मराठी चित्रपटात देखील झळकणार आहे. त्या दोघींनी एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आम्ही दोघी ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप–मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार न करता  समोरच्याचा दृष्टिकोनही ध्यानात घेतला पाहिजे ही बाब या चित्रपटात अधोरेखित होते. त्यामुळेच या चित्रपटाची गोष्ट आजच्या प्रत्येक तरुणीला आपलीशी वाटणार आहे. Also Read : प्रिया बापट आणि स्वप्निल जोशीचा जुना फोटो तुम्ही पाहिलात का?