ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - मलायका अरोरा-खान आणि अरबाज खान या दोघांमध्ये वांद्रे कुटुंब न्यायालयातही समेट घडून आला नाही. कारण मलायक घटस्फोट घेण्यावर कायम राहिली आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलायकाने अरबाजकडून 15 कोटी रुपयांच्या पोटगी मागणी केली आहे. मलायकाच्या या अवाढव्य रकमेच्या मागणीमुळे खान कुटुंबीय चिंतेत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अधिकृत अशी प्रतिक्रिया खान कुटुंबीयांकडून आलेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलायकाने कोर्टात 15 कोटी रुपयांची पोटगी मागितली असून यात वेगवेगळ्या रक्कमेचा समावेश आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात एक फ्लॅट, ज्याची किंमत जवळपास 3.5 कोटी रुपये इतकी आहे. मुलाच्या नावावर 2.5 कोटी रुपयांचा फिक्स्ड डिपॉझिट तसेच 2 कोटी रुपयांची कार, मुलगा 21 वर्षांचा होईपर्यंत त्याच्या शिक्षणासाठी प्रत्येक महिन्यात 5 लाख रुपये द्यावेत आणि स्वतःसाठी 5 कोटी रुपयांची पोटगीची मागणी मलायकाने केली आहे.
'मलायकाची मागणी पूर्ण करू शकत नाही अरबाज'
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज मलायकाची मागणी पूर्ण करण्यासाठी समर्थ नाहीत, असे अरबाजच्या वकिलांनी कोर्टात स्पष्ट केले आहे. त्यांचे करिअर आता मार्गावर नसून ज्या सिनेमांची त्याने निर्मिती केली त्यासाठी आर्थिक सहाय्य भाऊ सलमान खानने केले होते. तसेच संसार टिकवण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न केले, मात्र मलायकाने घटस्फोटाचा निर्णय घेतला होता, असेही अरबाजने कोर्टाला सांगितले. कोर्टाने दोघांचेही म्हणणे ऐकले असून दोघांनाही पोटगीवर विचार करायला सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मलायका आणि अरबाज यांचे लग्न 18 वर्षांपूर्वी झाले होते. एकेकाळी मलायका आणि अरबाजच्या जोडीला बॉलिवूडमधील परफेक्ट कपल आणि सुंदर जोडी मानले जायचे.