Join us

तरल भावनांचा काव्यात्म गोफ

By admin | Updated: July 18, 2015 04:08 IST

प्रारंभ, मध्य व शेवट असा चित्रपटांचा एक साचा ठरलेला आहे आणि प्रेक्षकांच्या तो अंगवळणी पडलेला आहे. परंतु अलीकडे मराठी चित्रपटांत वेगवेगळे प्रयोग होत आहेत.

- राज चिंचणकर (मराठी चित्रपट)

प्रारंभ, मध्य व शेवट असा चित्रपटांचा एक साचा ठरलेला आहे आणि प्रेक्षकांच्या तो अंगवळणी पडलेला आहे. परंतु अलीकडे मराठी चित्रपटांत वेगवेगळे प्रयोग होत आहेत. हे प्रयोग प्रेक्षकांची मानसिकता बदलण्याचाही प्रयत्न करत आहेत. ‘बायोस्कोप’ हा चित्रपट अगदी या पठडीत फिट्ट बसणारा आहे. चार लघुपटांना एकत्र गुंफून अख्खा चित्रपट तयार करणे ही तशी अवघड बाब; परंतु हे आव्हान स्वीकारत, चार कवितांचा आधार घेत, चार दिग्दर्शकांच्या माध्यमातून या चित्रपटाने तरल छटांचा एक काव्यात्म गोफ गुंफला आहे.मानवी भावभावनांच्या पायावर आणि मानवी व्यथांचा पट मांडत या चित्रपटाने चार लघुपटांना दृश्य स्वरूप दिले आहे. मिर्झा गालिब, सौमित्र, लोकनाथ यशवंत आणि संदीप खरे या चौघांच्या काव्यपंक्तींवर ‘बायोस्कोप’चा डोलारा उभा आहे. उर्दू भाषेची नजाकत पेश करणाऱ्या आणि मनाच्या तळाचा शोध घेणाऱ्या मिर्झा गालिब यांच्या ‘दिल ए नादान’ या शेरावर दिग्दर्शक गजेंद्र अहिरे याने याच नावाचा लघुपट ‘बायोस्कोप’च्या प्रारंभी सादर केला आहे. पद्म पुरस्काराने सन्मानित अशी गायिका निर्मलादेवी इंदोरी आणि त्यांना सारंगीची साथ करणारा सहवादक मियाजी यांचा आता उतरणीचा काळ सुरू आहे. एकमेकांना आधार देत हे दोघे जीवनाची नौका पुढे ढकलत आहेत. अशातच एक दिवशी दिल्लीहून एक रजिस्टर ए.डी. त्यांच्या नावे पोस्टात येऊन पडते आणि मैफिलीचे निमंत्रण आल्याचे समजून या दोघांच्या मनाला बऱ्याच वर्षांनी पालवी फुटते. पत्र वाचल्यानंतर त्या दोघांमध्ये निर्माण होणारे मानसिक द्वंद्व मांडत त्यातली नजाकत उत्कटतेने हा लघुपट पेश करतो. कवी सौमित्र याच्या कवितेवर दिग्दर्शक विजू माने याने ‘एक होता काऊ’ हा लघुपट निर्माण केला आहे. स्वप्निल हा तरुण त्याच्या काळ्या वर्णामुळे इतरांसाठी चेष्टेचा विषय बनला आहे. परिणामी, त्याच्या वाट्याला येणारे टक्केटोणपे तो अनुभवतो आहे. या प्रकारात त्याचे मूळ नाव कुणाच्या खिजगणतीतही नाही. या स्वप्निलचे शेजारच्या पाकळी या तरुणीवर नितांत प्रेम आहे; परंतु न्यूनगंडामुळे तो ते व्यक्त करण्यास धजत नाही. वर्णापेक्षा मनाचे सौंदर्य अधिक महत्त्वाचे मानणारी पाकळीसुद्धा त्याच्यावर प्रेम करते; पण ती त्याच्या व्यक्त होण्यासाठी थांबली आहे. सामाजिक मानसिकतेवर थेट भाष्य करणारा हा लघुपट हलक्याफुलक्या प्रसंगांची पेरणी करत बरेच काही सांगून जातो. शेतकऱ्यांच्या व्यथेवर अचूक बोट ठेवणारा दिग्दर्शक गिरीश मोहिते यांचा ‘बैल’ हा लघुपट कवी लोकनाथ यशवंत यांच्या काव्यावर आधारित आहे. एकीकडे कापसाला योग्य भाव मिळत नाही, अशा वास्तवाचे चटके अनुभवणारा पंजाबराव हा शेतकरी शहरात येतो आणि तिथला चंगळवाद पाहून त्याचा राग अनावर होतो. मातीत कष्ट उपसत घाम गाळणारा शेतकरी आणि त्याच्या जिवावर बाहेर चाललेली नफेखोरी याचे परस्परविरोधी प्रतिबिंब यात दिसते. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या कौटुंबिक स्थितीचे दर्शनही यात घडते. यात ‘बैल’ हे एक सूचक पात्र म्हणून समोर येते आणि त्याच्या नजरेतून ही सगळी विसंगती दृश्यमान होत जाते.दिग्दर्शक रवी जाधव याचा ‘मित्रा’ हा लघुपट कवी संदीप खरे याच्या कवितेवर बेतलेला असला, तरी त्याची मूळ कथा विजय तेंडुलकर यांची आहे. यातल्या नायिकेचा ‘सुमित्रा’पासून ‘मित्रा’पर्यंतचा होणारा प्रवास हा लघुपट रेखाटतो. सुमित्रा आणि विन्या यांच्यात चांगली मैत्री आहे आणि विन्याचे सुमित्रावर मनापासून प्रेम आहे. मात्र सुमित्राला कळायला लागल्यापासून एक पुरुषीपणाची झाक तिचे तनमन वेढून टाकते. आपण इतर मुलींपेक्षा वेगळ्या आहोत, ही जाणीव तिच्या मनात घट्ट रुजत जाते. ती हॉस्टेलवर राहायला आल्यावर तिची रूमपार्टनर ऊर्मीकडे सुमित्राचे मन सतत धाव घेत राहते. परिणामी, ती विन्याचे प्रेम नाकारते आणि खुल्या स्वातंत्र्याचा स्वीकार करते. या लघुपटातल्या विषयाला समांतर जात स्वातंत्र्य मिळण्याच्या काळाचा यात खुबीने उपयोग करून घेण्यात आला आहे; आणि त्यानुसार हा लघुपट कृष्णधवल रंगात चितारण्याचा केलेला प्रयोग ही त्याची गरजच असल्याचे सूचित होत जाते.या चारही लघुपटांचे सूत्र बांधताना कवी गुलजार यांच्या खर्जातल्या आवाजाचा केलेला उपयोग ही या ‘बायोस्कोप’ची खासियत म्हणावी लागेल. त्यांच्या आवाजातला गहिरेपणा ही साखळी अधिक जोरकस करतो. या लघुपटांतून ‘व्यथा’ हे सूत्र सामायिक असल्याचे जाणवत राहते खरे; परंतु तिचा गोफ विणताना हे सूत्र अधिक ठोसपणे यात उतरायला हवे होते असेही वाटत राहते. पण तरीही केवळ काव्यपंक्तींचा आधार घेऊन त्यावर चित्रपट बेतणे ही मात्र खरोखरच स्तुत्य बाब म्हणावी लागेल.‘दिल ए नादान’मध्ये नीना कुलकर्णी (निर्मलादेवी इंदोरी) आणि सुहास पळशीकर (मियाजी) यांची भन्नाट केमिस्ट्री पाहणे म्हणजे निव्वळ आनंद आहे. एका ज्येष्ठ गायिकेचे दिवस पालटल्यानंतरचे दिवस आणि तिला मियाजीची असलेली साथसोबत याच्या नजाकतीने केलेल्या चित्रणात या दोघांनी लाजवाब रंगकाम केले आहे. या लघुपटाची प्रत्येक फ्रेम कलेचा अनोखा आविष्कार मांडत मनात गजल छेडत जाते. ‘एक होता काऊ’मध्ये कुशल बद्रिकेने (स्वप्निल) त्याचा आगळा अंदाज दाखवला असून, स्पृहा जोशी (पाकळी) हिची लव्हेबल साथ त्याला मिळाली आहे. हलकेफुलके क्षण टिपत मनातल्या व्यथेच्या पार्श्वभूमीवर प्रेमाची अभिव्यक्ती फुलवत हा काऊ प्रसन्नतेचे नितळ चित्र रेखाटतो. ‘बैल’मध्ये मंगेश देसाई (पंजाबराव) याने त्याच्या अभिनयाची ताकद स्पष्ट केली असून त्वेष, अंगार, पिचलेपण अशा विविध भावना त्याने ठोस व्यक्त केल्या आहेत. यात शोभा या त्याच्या बायकोच्या भूमिकेत स्मिता तांबेने त्याला उत्तम साथ दिली आहे. ‘मित्रा’ या लघुपटात, सुमित्राची भूमिका थेट कोळून प्यायल्यागत वीणा जामकरने साकारली असून, ताकदीच्या अभिनयाची पेशकश केली आहे. समलिंगी संबंध या विषयाला हा लघुपट स्पर्श करत असला, तरी त्याची ट्रीटमेंट संयत आहे आणि त्यामुळे कुठेही त्याने त्याची पातळी सोडलेली नाही. या चौकटीत वीणाने तिची सुमित्रा फिट्ट बसवली आहे. कवी संदीप खरे याला विन्याच्या भूमिकेत पाहणे मजेशीर आहे; तर यात मृण्मयी देशपांडेच्या वाट्याला आलेल्या मोजक्या प्रसंगांत ती तिचा ठसा उमटवून जाते.