दिग्दर्शक अनीस बाजमी आणि निर्माता फिरोज नाडियादवाला यांनी २००७ मध्ये तयार केलेल्या ‘वेलकम’ चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर जोरदार यश मिळविले होते. आता हीच टीम ‘वेलकम बॅक’ हा सिक्वेल घेऊन आली आहे. या सिक्वेलमध्येही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी भरपूर मसाला वापरण्यात आला आहे. पटकथा वेगवान असून कलावंतांनीही उत्तम अभिनय केला आहे. जोडीला चटकदार संवादांमुळे हसण्यासाठीच्या गरजा भागतात.‘वेलकम बॅक’ची कथाही दुबईतीलच आहे. ‘वेलकम’मधील उदय शेट्टी (नाना पाटेकर) आणि त्याचा मजनूगिरी करणारा भाऊ (अनिल कपूर) आता जुने उद्योग सोडून सभ्य गृहस्थ बनले आहेत. उदय शेट्टीचे वडील आपल्या तिसऱ्या पत्नीपासून झालेली मुलगी रंजनाच्या (श्रुती हसन) लग्नाची जबाबदारी उदय आणि मजनूवर टाकतात. तिच्या लग्नासाठी उदय आणि मजनूचा संपर्क घुंगरूशी (परेश रावल) होतो. घुंगरूचा मुलगा अजय ऊर्फ अज्जू (जॉन अब्राहम) मुंबईत भाईगिरी करीत असतो. मुंबईत शिक्षण घेणारी रंजना अज्जूवर प्रेम करू लागते. उदय आणि मजनूने आपल्या निवडीला मान्यता द्यावी म्हणून अज्जूला घेऊन रंजना दुबईला येते. उदय आणि मजनूवर प्रेमाचे जाळे टाकण्यासाठी नजफगढची महाराणी (डिंपल कपाडिया) आणि तिची मुलगी राजकन्या (अंकिता श्रीवास्तव) बनून व मुंबईच्या दोन महिला ठग बनून दुबईत दाखल होतात. या कथेत वाँटेड भाई (नसिरुद्दीन शाह) आणि त्याचा मुलगादेखील (शायनी आहुजा) आहे. वाँटेडचा मुलगा रंजनावर प्रेम करीत असून तिच्याशी त्याला लग्न करायचे असते. या सगळ्या पात्रांमध्ये जोरदार संघर्ष सुरू असतो. प्रेक्षकांना हसवताना छान वळणे घेताना ‘वेलकम बॅक’चा शेवट मजेदार होतो.वैशिष्ट्ये : अनिस बाजमी दिग्दर्शकाशिवाय लेखकही आहेत आणि ‘वेलकम’प्रमाणेच येथेही त्यांनी प्रत्येक पात्र आणि प्रत्येक प्रसंगाला विनोदाची झालर लावली आहे. याच कारणामुळे चित्रपटाची रेल्वे कॉमेडीच्या रुळांवरून पळत राहते. मनोरंजन होईल असे भरपूर प्रसंग आणि संवादांमुळे प्रेक्षकांना हसण्याची पुन्हा पुन्हा संधी मिळते. सिक्वेलची कथा मूळ ‘वेलकम’सारखीच आहे. अनिस बाजमींनी कौशल्याने जुन्या पात्रांना आणि त्यांच्या संवादांना नव्या चित्रपटाशी जोडले आहे. चित्रपट रंजक करण्यात अभिनेत्यांची निवड महत्त्वाची ठरली आहे. ‘वेलकम’मध्ये धमाल करणारे नाना पाटेकर आणि अनिल कपूरबरोबर परेश रावल यांनी सिक्वेलमध्येही आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडताना आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. ‘वेलकम बॅक’मध्ये प्रथमच आलेले जॉन अब्राहम, श्रुती हसन, नसिरुद्दीन शाह, डिंपल कपाडिया, राजपाल यादव यांनीही आपल्या भूमिकांची दखल प्रेक्षकांना घ्यायला लावली आहे. नवी नायिका अंकिता श्रीवास्तवचा समावेश ग्लॅमरसाठीच करण्यात आला असून तिने हे काम जोरात केले आहे. दुबईमधील लोकेशन भव्य असून चित्रपटाच्या भव्यतेला त्यामुळे झळाळी येते. चित्रपटाच्या भव्यतेसाठी भरपूर पैसा खर्च करण्यात आला आहे. चित्रपटाची तांत्रिक अंगे प्रभावी आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अनिस बाजमी यशस्वी ठरले आहेत.का पाहावा : कॉमेडीची कमाल, हास्याची धमाल अनुभवण्यासाठी.का पाहू नये : ज्यांना गंभीर चित्रपट आवडतात त्यांनी यापासून दूर राहावे.उणिवा : अशा स्वरूपाचे कॉमेडी चित्रपट बघताना विचार करण्याची गरज असत नाही. एखाद्याने विचार केला तर त्याला काहीही समजणार नाही. किती तरी प्रसंगांत चित्रपटाचा वेग सुस्तावतो आणि तुलनाच केली तर ‘वेलकम’ याच्यापेक्षा उजवा ठरतो. चित्रपटाचे संगीत फार काही चांगले नाही. जॉन अब्राहमने स्वत: एक गीत गायले असले तरी त्यात फार दम नाही.
हसता हसता पुरेवाट
By admin | Updated: September 4, 2015 23:12 IST