Join us  

'लागीरं झालं जी' मालिकेतील जीजीचे निधन; कमल ठोके यांच्यावर आज अंत्यसंस्कार

By हेमंत बावकर | Published: November 15, 2020 2:06 AM

Kamal Thoke death: १९९२ मध्ये चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रवेश केला पण कराडसारख्या ठिकाणी राहून आणि शिक्षकाची नोकरी करून ते काम करणे अवघड होते.

'लागीरं झालं जी' या झी मराठी वाहिनीवरील मालिकेला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. मालिकेतील जिजीचे पात्र साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचे शनिवारी निधन झाले आहे. मुलगा सुनिल याच्याकडे बंगळुरू येथे राहण्यास गेल्या होत्या. जीजी यांचे निधन झाल्याने मालिकेतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. 

कमल ठोके यांना कर्करोग झाला होता. कमल ठोके यांच्यावर कराड येथिल त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काही मराठी चित्रपटांतूनही त्यांनी अभिनय साकारला होता. १९९२ मध्ये चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रवेश केला पण कराडसारख्या ठिकाणी राहून आणि शिक्षकाची नोकरी करून ते काम करणे अवघड होते. त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी चित्रपट क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवले. बाबा लगीन, बरड, माहेरचा आहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, आम्ही असू लाडके, ना. मुख्यमंत्री गावडे शा अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. 

मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त कमल ठोके यांचे सुरुवातीचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले होते. पण शिक्षणाच्या आवडीमुळे रात्रशाळेत जाऊन जुनी अकरावी पूर्ण केली आणि गणपती ठोके या शिक्षकांबरोबर विवाह झाल्यावर यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठातून एम ए पर्यंत शिक्षण घेतले. शिवाय तिथेच अध्यापनशास्त्राचेही शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षिका म्हणून ३३ वर्षं नोकरी केली. २००५ मध्ये त्या मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते मिळाला होता. 

ठोकेबाईंना अगदी लहानपणापासून अभिनयाची आणि संगीताची आवड होती. पूर्वी गणेशोत्सवात मेळे व्हायचे. वयाच्या चौथ्या वर्षांपासून त्यांनी शाहीर यादव यांच्या मेळ्यात कामे केली. संगीत कलेचे त्यांना एवढे वेड होते की, एकदा लहान असताना घरावरून कोका हे वाद्य वाजवणाऱ्या विक्रेत्याच्या मागेमागे गेल्या आणि चुकल्या. संगीताचे शास्त्रीय शिक्षण काही त्यांना घेता आले नाही पण दिलेल्या पट्टीत गायचे ही एकलव्याची साधना मात्र प्रामाणिकपणे केली. त्यातही विशेष म्हणजे ज्या काळात स्त्रिया घराबाहेर पडून कला सादर करत नसत, तेव्हा त्या बिस्मिल्ला ब्रास बँड मध्ये गायच्या. त्यानंतर त्यांनी गावोगाव भक्तीगीतांचे कार्यक्रमही केले. 

टॅग्स :लागिरं झालं जीमराठी