Join us  

'लागिरं झालं जी' मालिकेतील शितली झळकणार या चित्रपटात, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 6:00 AM

शितलीच्या भूमिकेतून अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) हिने घराघरात लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेनंतर ती कुसूम या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती. या मालिकेने देखील काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता शिवानी बावकर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका लागिरं झालं जी(Lagir Jhala Ji)ने प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ उलटलेला असताना या मालिकेतील पात्रं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेतून शितलीच्या भूमिकेतून अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) हिने घराघरात लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेनंतर ती कुसूम (Kusum) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती. या मालिकेने देखील काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता शिवानी बावकर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ती 'गुल्हर'  (Gulhar) या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

आयडियल व्हेंचरच्या बॅनरखाली निर्माते शांताराम (आप्पा) मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, अबिद सय्यद यांनी 'गुल्हर'ची निर्मिती केली आहे. 'गुल्हर'च्या दिग्दर्शनासोबतच रमेश चौधरी यांनी यात मुख्य भूमिकाही साकारली आहे. 'लागीरं झालं जी' मालिकेतील शितली म्हणजेच शिवानी बावकर या चित्रपटात रमेश चौधरींसोबत मुख्य भूमिकेत आहे. या दोघांवर चित्रीत करण्यात आलेलं 'लहर आली, लहर आली गं...' हे गाणं 'गुल्हर'मधील दोघांच्या प्रेमकथेत गुलाबी रंग भरण्याचं काम करणारं आहे. या निमित्तानं प्रेक्षकांना शिवानी आणि रमेश या नव्या जोडीची केमिस्ट्री अनुभवता येणार आहे.

गुल्हर या चित्रपटाची कथा जरी एका ११ वर्षांच्या मुलाभोवती गुंफण्यात आली असली तरी त्यात एका प्रेमी युगुलाच्या लव्ह स्टोरीचा अँगलही आहे. हे गाणं वैभव कुलकर्णी आणि पद्मनाभ गायकवाड यांनी लिहिलं असून, पद्मनाभनंच अजय गोगावले आणि अपूर्वा निशादच्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे. रिलीज करण्यात आलेलं या गाण्याचं लक्षवेधी पोस्टर उत्सुकता वाढवणारं आहे. पावसात भिजणारी शिवानी-रमेश ही जोडी या पोस्टरवर आहे. 

६ मे रोजी गुल्हर चित्रपट रिलीज होणार आहे. मोहन पडवळ यांनी 'गुल्हर'ची कथा लिहिली असून, संजय नवगिरे यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. शिवानी-रमेश या जोडीसोबत या चित्रपटात रवी काळे, भार्गवी चिरमुले, विनायक पोद्दार, माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, गणेश कोकाटे, कपिल कदम, पुष्पा चौधरी, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत, स्वप्नील लांडगे, रेश्मा फडतरे, सचिन माळवदे, देवेंद्र वायाळ, गणेश शितोळे आदि कलाकारांनी अभिनय केला आहे. उत्तम डिओपी आणि संकलक म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुमार डोंगरे यांनी सिनेमॅटोग्राफीसोबतच संकलनही केलं आहे. केदार दिवेकर यांनी पार्श्वसंगीत, विशाल पाटील यांनी नृत्य दिग्दर्शन, तर निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर यांनी ध्वनी आरेखन केलं आहे. योगेश दीक्षित यांनी डिआयचं काम पाहिलं आहे. या चित्रपटाचे प्रोजेक्ट हेड अमर लष्कर आहेत.

टॅग्स :शिवानी बावकरलागिरं झालं जी