बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान(Saif Ali Khan)चा लेक लवकरच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) चित्रपट निर्माता करण जोहर(Karan Johar)च्या 'नादानियां' (Nadaaniyan Movie) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्यासोबत या सिनेमात खुशी कपूर दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केल्यानंतर आता त्याचे पहिले गाणे ‘तेरे इश्क में’ देखील रिलीज झाले आहे.
सैफ अली खाननंतर त्याचा मुलगा इब्राहिम अली खानचा डेब्यू चित्रपट 'नादानियां'चा ट्रेलरही नेटफ्लिक्सच्या भव्य मंचावर लाँच करण्यात आला. यावेळी मंचावर चित्रपटाची नायिका खुशी कपूर आणि निर्माता करण जोहरही उपस्थित होते. यावेळी इब्राहिम आणि खुशी यांनी त्यांच्या चित्रपटातील एका गाण्यावर परफॉर्मन्सही केला. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
कसा आहे इब्राहिम आणि खुशीचा चित्रपट?'नादानियां' हा एक रोमँटिक ड्रामा कॉमेडी चित्रपट आहे. ज्यामध्ये दिल्लीची मुलगी आणि मध्यमवर्गीय मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये खुशी तिच्या एका मित्राला वाचवण्यासाठी इब्राहिमला तिचा फेक बॉयफ्रेंड बनवते. त्यानंतर चित्रपटाची कथा या दोघांभोवती फिरते. त्यांची जोडी पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक दिसत आहेत.
''नवीन प्रेमकथेवर आधारीत नादानियां''या चित्रपटाबाबत टीमने सांगितले की, ''नादानियांमध्ये एक नवीन प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी खुशी कपूरसोबत इब्राहिम अली खानला पडद्यावर पाहणे देखील खूप खास असेल. आम्ही ही आधुनिक प्रेमकथा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी खूप उत्सुक आहोत.'' खुशी कपूरने झोया अख्तरच्या 'द आर्चिज' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. याशिवाय ती लवकरच जुनैद खानसोबत 'लवयापा' चित्रपटातही दिसणार आहे.