Join us

काव्यसुमनांची उधळण ‘लोपामुद्रा’

By admin | Updated: September 3, 2015 23:52 IST

शाळेतील बाई विद्या पटवर्धन यांच्यामुळे. त्यानंतर कॉलेज वयात तिने नाटकांमधून रंगभूमीवरही पदार्पण केले. तरीदेखील तिने अभिनय क्षेत्रात करिअर करायचे ठरविले नव्हते

लहानपणी ‘दे धमाल’ मालिकेतील दोन वेण्या, चष्मा घालणारी, उंच आणि हुशार अशी तिची ओळख तयार झाली, ती तिच्या शाळेतील बाई विद्या पटवर्धन यांच्यामुळे. त्यानंतर कॉलेज वयात तिने नाटकांमधून रंगभूमीवरही पदार्पण केले. तरीदेखील तिने अभिनय क्षेत्रात करिअर करायचे ठरविले नव्हते. पण, ज्या वेळी हा निर्णय घेतला त्या वेळी अभिनयाकडे छंद म्हणूनच पाहिले. तिने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या, त्याचे कौतुकही झाले, तर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील एका शब्दावरून कविता सुचणाऱ्या कुहूच्या भूमिकेमुळे ती खऱ्या अर्थाने घराघरांत पोहोचली. पण, ‘कवयित्री’ हीच तिची खरी ओळख. यावरून ती अभिनेत्री कोण असेल याचा अंदाज आला असेलच. हो... अगदी बरोबर... स्पृहा जोशी. अभिनयाबरोबरच काव्यलेखनाचा तिचा यशस्वीतेचा आलेख हा दिवसागणिक उंचावतच चालला आहे. परंतु शब्दांची काव्यसुमनं ओंजळीत न ठेवता मुक्तपणे रसिकांवर त्याची उधळण ती करत आहे ‘लोपामुद्रा’च्या माध्यमातून. अभिनयातून जेवढी ती ओपन होत नाही त्यापेक्षा अधिक कवितेतून ती व्यक्त होताना दिसते. म्हणूनच केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे, तर उत्तम कवयित्री म्हणूनही ती रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचली आहे. एका अभिनेत्रीला यापेक्षा अधिक ते काय हवे. म्हणूनच रसिकांना चटकन आपलेसे करू शकणाऱ्या साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंत कवींचा शब्दरूपी नजराणा ती ‘लोपामुद्रा’द्वारे रसिकांसमोर खुला करत आहे. येत्या ८ सप्टेंबरला ‘लोपामुद्रा’ या तिच्या सोशल काव्यसंग्रहाला १ वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यानिमित्त हा प्रवास तिने ‘सीएनएक्स’ला दिलेल्या मुलाखतीत उलगडला. ‘लोपामुद्रा’च्या आॅनलाइन निर्मितीबद्दल स्पृहा सांगते, ‘लोपामुद्रा’ या काव्यसंग्रहाचे एक वर्षापूर्वी पुस्तक प्रकाशित करण्यात आले. खरंतर हा प्रवास जेव्हा सुरू झाला तेव्हा लोपामुद्रा हे फक्त एका पेजपुरतं मर्यादित होतं. मात्र, तरीही त्याला लाइक्स आणि कमेंट्सच्या रूपाने खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. पण, तेव्हा असं आमच्या लक्षात आलं, की इतक्या मोठ्या संख्येने समविचारी लोकांनी लाइक केलेलं पेज वाया जाऊ नये आणि हे केवळ पुस्तकापुरतं मर्यादित न ठेवता हा कवितासंग्रह ट्विटर, फेसबुकच्या मदतीने वाचकांना आॅनलाइन उपलब्ध करून द्यावा. कारण सध्याच्या काळात कागदरूपी कविता आपल्याला वाचायला उपलब्ध होईल किंवा वेळ मिळेल याची काहीच शाश्वती नसते. मग ही कविता समजा फेसबुक रूपातून समोर आली तर? असा विचार डोक्यात आला. या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मला खरी मदत मिळाली ती उदय कर्वे, सचिन दळवी, विकास गांजय, मंदार फडके आणि अमृता कुलकर्णी या मित्र-मैत्रिणींची. या उपक्रमासाठी आम्ही आवडलेल्या कविता एकमेकांशी शेअर करू लागलो.