ृऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20- अभिनेत्री कंगणा राणावत "मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी" या सिनेमाच्या सेटवर गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनगाथेवर हा सिनेमा आधारीत असून सिनेमाचं शूटिंग सध्या रामोजी फिल्म सीटीमध्ये सुरू आहे. सिनेमात तलवारबाजीचा एक सीन सुरू असताना कंगणाच्या डोक्यावर तलवार लागल्याचं समजतं आहे. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली असून तिला लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सिनेमातील कंगणा राणावत आणि निहार पंड्या यांच्यातील तलवारबाजीचं शूटिंग सुरू होतं. हा सीन शूट होत असताना निहारचा अंदाज चुकला आणि तलवार कंगणाच्या डोक्यावर लागली. यामध्ये कंगणाला जबर जखम झाली आहे. तिच्या डोक्यावर 15 टाके पडल्याचीही माहिती मिळते आहे. मीड डेने ही बातमी दिली आहे. या क्लायमॅक्स सीनसाठी कंगणाने आधी बऱ्याचवेळा सराव केला होता. पण मुख्य शूट सुरू झाल्यावर ही घटना घडली.
तलवार लागल्याने कंगणाच्या कपाळावर 15 टाके पडले असून तिला निगराणीसाठी हॉस्पिटलमध्ये काही दिवस ठेवण्यात येइल, अशी माहिती सिनेमाच्या निर्मात्यांनी दिली आहे. कंगणाला पुढील आठवड्यात डिस्चार्ज केलं जाणार आहे. तसंच तिच्या कपाळावर जखमेची खूण राहू शकते, त्यामुळे तिला कॉस्मेटीक सर्जरी करावी लागू शकते, असंही सुत्रांकडून समजतं आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस कंगणाला सिनेमाचं शूटिंग करता येणार नाही.