Join us  

जिमी शेरगिलची लव्हस्टोरी आहे एखाद्या चित्रपटाप्रमाणे, पाहा त्याच्या पत्नीचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 1:20 PM

जिमीची पत्नी प्रियंकाने केवळ बदला घेण्यासाठी त्याच्यासोबत लग्न केले असल्याचा खुलासा त्याने या मुलाखतीत केला आहे.

ठळक मुद्देजिमीने एका मुलाखतीत सांगितले होते की, प्रियंका ही माझ्या आयुष्यात आलेली पहिली मुलगी होती. प्रियंकाला हसतखेळत जगायला आवडतं. तिने मला जितके खळखळून हसवलं, तितके कोणीच मला खळखळून हसवलं नव्हतं.

जिमी शेरगिलने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये एक स्थान निर्माण केले आहे. जिमीचा नुकताच ५० वा वाढदिवस झाला. जिमीने गेल्या काही वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. जिमी अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये असला तरी त्याच्या खाजगी आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहीत आहे. जिमीच्या पत्नीचे नाव प्रियंका असून त्यांच्या दोघांच्या नात्याविषयी एक खास गोष्ट त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितली आहे. जिमीची पत्नी प्रियंकाने केवळ बदला घेण्यासाठी त्याच्यासोबत लग्न केले असल्याचा खुलासा त्याने या मुलाखतीत केला आहे.

जिमी आणि प्रियंकाची लव्ह स्टोरी ही एखाद्या चित्रपटातल्या लव्हस्टोरीप्रमाणेच आहे. जिमी शेरगिलच्या पत्नीने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. तिने सांगितले होते की, मोहोब्बते हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. कारण हा चित्रपट पाहिल्यानंतर मी माझ्या वडिलांना सांगितले होते की, मी जिमीसोबतच लग्न करणार... माझी आणि जिमीची ओळख आमच्या एका नातलगाच्या लग्नात झाली होती. आमची काहीच दिवसांत मैत्री झाली. पण मैत्रीचे प्रेमात रुपांतर व्हायला खूप दिवस लागले. 

जिमीने एका मुलाखतीत सांगितले होते की, प्रियंका ही माझ्या आयुष्यात आलेली पहिली मुलगी होती. प्रियंकाला हसतखेळत जगायला आवडतं. तिने मला जितके खळखळून हसवलं, तितके कोणीच मला खळखळून हसवलं नव्हतं. पण मी तिच्यासमोर सतत हसायचो म्हणून तिला वाटायचं की मी तिच्यावर हसतोय. याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी प्रियंकाने माझ्यासोबत लग्न केले. 

जिमी शेरगिल हा मुळचा गोरखपूरचा असून त्याचा जन्म ३ डिसेंबर १९७० ला झाला. जिमीने त्याचे सुरुवातीचे शिक्षण लखनऊमधील सेंट फ्रान्सिस कॉलेजमध्ये घेतले आहे. त्यानंतर त्या पुढचे शिक्षण पंजाबमध्ये झाले. शिक्षण झाल्यानंतर त्याने कोणतीही नोकरी न करता चित्रपटात त्याचे नशीब आजमावायचे ठरवले आणि तो मुंबईत स्थायिक झाला. मुंबईत आल्यानंतर त्याने रोशन तनेजाकडे अभिनयाचे धडे गिरवले. जिमीने १९९६ मध्ये माचिस या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुलजार यांनी केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच कलेक्शन केले. या चित्रपटातील जिमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटानंतर त्याला अमिताभ बच्चन, शाहरुख खानसारख्या दिग्गजांसोबत मोहोब्बते या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याने ए वेडनेस्डे, माय नेम इज खान, तनु वेड्स मनू, साहेब बीवी और गँगस्टर, स्पेशल २६, बुलेट राजा, फुगली, तनू वेड्स मनू रिटर्न्स, मदारी यांसारख्या चित्रपटात एकाहून एक सरस भूमिका साकारल्या. 

टॅग्स :जिमी शेरगिल