ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - बॉलीवूडमध्ये सिरीयल किसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इम्रान हाश्मीसोबत काम करण्यासाठी अभिनेत्रींना आता कुटुंबीयांची मनधरणी करावी लागत आहे. 'मिस्टर एक्स' या चित्रपटात इम्रान हाश्मीसोबत काम करणा-या अमायरा दस्तूरने ही कबूली दिली आहे. इम्रानसोबत काम केले तर तुझ्याशी लग्न कोण करणार असा सवाल माझ्या आईने विचारला होता अशी आठवण अमायराने सांगितली आहे.
प्रतिक बब्बरसोहत इसक या सिनेमातून पदार्पण करणारी अभिनेत्री अमायरा दस्तूर आता इम्रान हाश्मीसोबत 'मिस्टर एक्स' या सिनेमात झळकणार आहे. अमायराचा इसक हा सिनेमा सपाटून आपटला होता. यानंतरही अमायराला थेट भट कॅम्पमध्ये प्रवेश मिळाला आहे. या प्रवासाविषयी अमायराने नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यामध्ये अमायरा म्हणते, मिस्टर एक्ससाठी मी ऑडिशन दिले होते. यानंतर विक्रम भट यांनी माझी निवड केली. चित्रपटात माझा हिरो कोण असेल याची मला सुतरामही कल्पना नव्हती. काही दिवसांनी इम्रान हाश्मी चित्रपटात प्रमुख भूमिकेत असल्याचे समजले असे अमायराने सांगितले. इम्रान हाश्मीचे मी फारशे चित्रपट बघितले नव्हते. पण त्यांच्या 'सिरीयल किसर' प्रतिमेची मला माहिती होती. मग मी आईवडिलांना याची माहिती दिली. त्याच्यासोबत काम केले तर तुझ्याशी लग्न कोण करणार असा मोठा प्रश्न तिला पडला होता असे अमायरा आठवणीने सांगते. बाबांनीही इम्रान सोबत काम करताना भरपूर सल्ले दिले. घरच्यांची समजूत काढल्यावर मी चित्रपटाचे शूटिंग सुरु केले असेही तिने स्पष्ट केले.