Join us

मी काम सोडलंय ही निव्वळ अफवा- मयुरी वाघ

By admin | Updated: March 10, 2017 11:47 IST

लग्न झाल्यामुळे मी काम सोडलंय ही निव्वळ अफवा असून मी पुन्हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, असे अभिनेत्री मयुरी वाघने स्पष्ट केले.

मीनाक्षी कुलकर्णी, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - खासगी गुप्तहेर ' अस्मिता'च्या रुपाने रोज तुम्हाला भेटायला येणारी तुमची लाडकी अभिनेत्री मयुरी वाघ ही नुकतीच अभिनेता पियुष रानडेशी विवाहबद्द झाली. ' अस्मिता' मालिकेत एकत्र काम करतानाच पडद्यावरची ही जोडी प्रत्यक्षातही आयुष्यभराचे जोडीदार बनले. महिन्याभरापूर्वीच बडोद्यात त्यांचा शानदार विवाहसोहळा पार पडला. तर त्याच्या काही दिवसांआधीच ' अस्मिता' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. सर्वांची लाडकी ' अस्मिता' छोटा पडद्यावर दिसत नसल्याने तिचे चाहतेही अस्वस्थ झाले. मात्र घाबरू नका, तुमची लाडकी अभिनेत्री मयुरी वाघ लवकरच पुन्हा तुमच्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. खुद्द मयुरीनेच 'लोकमत'ला ही बातमी दिली. ' मी काम सोडलेलं नसून या सर्व अफवा आहेत. मी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे' असे तिने स्पष्ट केले. 
या संपूर्ण प्रवासाविषयी मयुरी सांगते, 'जानेवारी महिन्यात 'अस्मिता' म्हणजेच मी प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि लग्नाच्या तयारीत गुंतले. पियुष आणि मी आधीपासूनच खूप चांगले मित्र होतो, त्यामुळे आपला चांगला मित्रच आयुष्याचा जोडीदार बनतोय, ही गोष्टच माझ्यासाठी खूप आनंदाची होती. त्याच्याशी लग्न करायचं, संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवायंच या कल्पनेने इतर मुलींसारखी मीही हरखून गेले. फेब्रुवारीत आमचं लग्न पार पडलं आणि मग शिफ्टिंग, नवीन माणसं, नाती या सगळ्यांची ओळख करून घेता घेता एक महिना कसा निघून गेला हे कळलंच नाही. मात्र आता महिन्याभराच्या ब्रेकनंतर मी पुन्ह कामाकड वळले असून लवकरच एखाद्या नव्या प्रोजेक्टच्या द्वारे मी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे' असं तिने नमूद केलं.
चित्रपट, मालिका, निवेदन आणि नाटक या चारही माध्यमांत काम केलेल्या मयुरीने पुनरागमन कसं करणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवलं आहे. ज्या ' अस्मिता'ने तुला घराघरांत पोहोचवलं, प्रेक्षकांचं भरभरून प्रेम दिलं त्याचा पुढचा भाग कधी येणार असं विचारलं असता, ' याच उत्तर आत्ताच देता येणार नाही पण लवकरच प्रेक्षकांना सरप्राईज मिळेल' असं सांगत मयुरीने गुपित कायम ठेवले आहे. मात्र एकाच पठडीत न अडकता एखादी वेगळी भूमिका किंवा छानशा लव्हस्टोरीतही काम करायला आवडेल, असी इच्छा तिने व्यक्त केली.
(अभिनेत्री मयुरी वाघच्या मेहेंदीचे फोटो पाहिलेत का?)
(मयुरी वाघ- पियुष रानडे अडकले विवाहबंधनात!)
(मयुरी वाघ -पियुष रानडेच्या विवाहसोहळ्याचे फोटो पाहिलेत का?) 
मालिका संपल्या की चित्रपट किंवा नाटकातून काम करण्याचा ट्रेंड सध्या वाढताना दिसत आहे. मालिकांमधून लोकप्रिय झालेले तेजश्री प्रधान, शशांक केतकर, सुयश टिळक, सुरूची अडारकर हे अभिनेते नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस आले. मयुरीचाही असाच काहीसा मानस आहे. ' मांगल्याचं लेणं' या डान्स-बेस्ड नाटकात मयुरीने यापूर्वी काम केलं आहेच. पण आता ब-याच वर्षांच्या गॅपनंतर तिला रंगभूमी पुन्हा खुणावत आहे. ' नाटकाची तालीम, कलाकारांसोबची केमिस्ट्री, प्रेक्षकांचा लाईव्ह रिस्पॉन्स हे सगळं खूप महत्वाचं आणि आनंददायी असतं. मुख्य म्हणजे एक अभिनेता म्हणून तुम्ही नक्की कुठे उभे आहात, हेही नाटकामुळे कळतं. तिथे तुम्ही वेगळे प्रयोग करून पाहू शकता' असं सांगत एक- दोन नाटकांविषयी बोलणं झालं असून लवकरच काहीतरी नवीन काम सुरू होईल, असे मयुरीने नमूद केले.
अभिनयासारखं प्रचंड वेळ मागणारं करीअर आणि लग्नानंतरच नवीन आयुष्य, याचा मेळ कसा राखतेस? असं विचारलं असता मयुरी म्हणते, ' जशा इतर स्त्रिया काम करतात तसंच मीही करते. सुदैवाने माझा नवरा, पियुषही याच क्षेत्रातला असल्याने त्याला आणि माझ्या सासू-सास-यांनाही इथल्या कामाची पद्धत, वेळ या सगळ्याची पूरेपूर कल्पना आहे. ते सगळेच मला नेहमी सांभाळून घेतात. लग्न झालंय म्हणून मी काम सोडून घरी बसावं, अशी त्यांची विचारसरणी बिलकूल नाही. उलट ते मला नवनवीन कामासाठी, प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन देतात, माझ्या कामाच्या आड कोणत्याही गोष्टी येऊ देत नाहीत. त्यांच्यामुळेच अवघ्या महिन्याभरात मी नव्या इनिंगसाठी सज्ज झाले' असे मयुरी कौतुकाने सांगते.