Join us  

अरुणा इराणीजींकडून मला खूप काही शिकायला मिळाले - संगीता घोष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 8:40 PM

‘दिव्य दृष्टी’ या मालिकेत पिशाचिनीच्या भूमिकेतील आपल्या अदाकारीने संगीता घोष या अभिनेत्रीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.

स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेत पिशाचिनीच्या भूमिकेतील आपल्या अदाकारीने संगीता घोष या अभिनेत्रीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. संगीताने यापूर्वी ‘देश में निकला होगा चाँद’ आणि ‘रिश्तों का चक्रव्यूह’ या मालिकांतील भूमिकांद्वारे आपल्या दर्जेदार अभिनयाचा प्रत्यय प्रेक्षकांना दिला होता. पण या मालिकेत तिला प्रथमच एका अगदीच वेगळ्या रूपात आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर टाकताना पाहणे थक्क करणारे आहे.

टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्याचा अनुभव असलेल्या संगीताला तिच्या सहकलाकारांबरोबरच्या अनुभवाविषयी विचारणा केली असता ती म्हणाली, “स्टार प्लसवरील देश में निकला होगा चाँद’ या मालिकेत मी अरुणा इराणीजींबरोबर पूर्वी एकत्र भूमिका साकारली असून त्यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव फारच आनंददायक होता. 300 पेक्षा अधिक चित्रपटांतून विविध भूमिका साकारलेल्या अरुणाजींना निर्मिती आणि दिग्दर्शनाचाही अनुभव आहे. त्या मला पदोपदी मार्गदर्शन करीत असत. टीव्ही मालिकांतील अभिनयांतील बारकावे मी त्यांच्याकडूनच शिकले. त्या एक अप्रतिम अभिनेत्री असून आपल्या अभिनयगुणांनी त्या दरवेळी आपल्याला भारावून सोडतात. मी नेहमीच मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे बघते आणि त्यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीबरोबर मला एकत्र भूमिका साकारता आली, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते.”‘दिव्य दृष्टी’ या मालिकेतील आपल्या पिशाचिनीच्या भूमिकेने संगीताने प्रेक्षकांवर आपली मोहिनी टाकली आहे. ‘दिव्य दृष्टी’ ही अंगी विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीला भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती असते; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्या हिच्याकडे असते! अर्थात कोणतीही विशेष शक्ती असली, तरी त्याबरोबर काही तोटेही येतात आणि या दोन्ही बहिणींना पिशाचिनींपासून धोका असतो. 

टॅग्स :संगीता घोषस्टार प्लस