Join us  

मी मुलाचं नाव अलेक्झांडर वा राम ठेवू शकत नाही - सैफ अली खान

By admin | Published: February 16, 2017 1:53 PM

नाम मै क्या रखा है असे विचारत अभिनेता सैफ अली खानने तैमूर नावावरून सुरू असलेल्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ -  अभिनेत्री करीना कपूर -खान आणि सैफ अली खानचा मुलगा जन्माला येण्यापूर्वीच सेलिब्रिटी बनला. गरोदरपणातही करीना कसं काम करते, काय कपडे घालते, काय खाते, या आणि अशा अनेक गोष्टींची सतत चर्चा सुरू होती. अखेर २० डिसेंबर रोजी करीनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावही झाला. मात्र त्यानंतर करीना-सैफने त्यांच्या मुलाचे नाव 'तैमूर' ठेवल्यामुळे नवा वाद निर्माण झाला. नेटिझन्सनी त्या नावावर आक्षेप घेत खिल्ली उडवली होती, त्यावर सैफने आपले मौन सोडत  घराण्याच्या नव्या वारसदाराचं नाव तैमूर अली खान पतौडी का ठेवलं याचा खुलासाही केला. मात्र हा वाद अद्यापही शमलेला नसून अनेकजण अजूनही या नावावरून टीका करताना दिसतात. 
याच पार्श्वभूमीवर एनडीटीव्हीशी बोलताना सैफने हेच नाव ठेवण्यामागचे कारण पुन्हा एकदा स्पष्ट करत 'नाम मे क्या रखा है' असा सवालही विचारला आहे. ' जगात आजही काही प्रमाणात ‘इस्लामोफोबिया’ अस्तित्वात आहे, याची मला जाणीव आहे. पण मुस्लिम म्हणून आपण त्याची जबाबदारी घेतली नाही तर कोण घेईल ? ' असा सवाल सैफने विचारला. ' मी माझ्या मुलाचं नाव अलेक्झांडर किंवा राम ठेवू शकत नाही. पण मग त्याच एखादं छानसं मुस्लिम नाव ठेवून  त्याला धर्मनिरेपक्ष शिकवण देता येईल. भविष्यात त्याच्या संपर्कात येणा-यांना तो किती चांगला माणूस आहे, हे लोकांना समजेल. त्यामुळे त्याच्या नावासी जोडलेला वाद संपुष्टात येईल' असेही सैफने नमूद केले. 
 
(मुलाचे नाव तैमूर का ठेवलं? सैफचा खुलासा)
(सैफ-करीनाचा मुलगा तैमूरची पहिली झलक) 
 
तिमुरचे नाव त्यामागचा इतिहास याबद्दल आपल्याला कल्पना असल्याचेही त्याने सांगितले, मात्र त्याच कारणामुळे आपण मुलाचे नाव तैमुर ठेवले असे नाही, हेही त्याने स्पष्ट केले  ‘  तिमूर हा क्रूर शासक होता, याची मला कल्पना आहे. पण तो तिमुर तर हा  तैमूर आहे. या दोन्ही नावांमध्ये साधर्म्य असू शकतं, कारण त्यांची पाळेमुळे काही प्रमाणात सारखी आहेत. पण आजच्या नजरेने भूतकाळाबद्दल आडाखे बांधणं हेही विचित्र आहे असे सांगत नावात काहीही नसतं असेही सैफने नमूद केले. ‘अशोका’ आणि ‘अलेक्झॅंडर’ ही नावंसुद्धा हिंसकच आहेत’, असे सांगत त्याने तैमुरच्या नावावरून सुरू असलेल्या वादाला सडेतोड उत्तर दिले.
एवढेच नव्हे तर ' त्याच तिमूरचा मुलगा शाहरूख हाच त्याच सर्वात कार्यक्षम सेनाधिकारी होता' असेही त्याने जाता जाता स्पष्ट केले.