Join us  

आय एम ग्रेटा : पर्यावरणाचा पुळका आलेल्या नेत्यांवर आसूड

By संदीप आडनाईक | Published: January 21, 2021 9:18 PM

i am greta : आय एम ग्रेटा हा माहितीपट ग्रेटा थनबर्ग या युवा कार्यकर्तीवर आधारित आंतरराष्ट्रीय निर्मिती संस्थाचा प्रकल्प आहे. या माहितीपटात तिने स्वतः काम केले आहे.

पणजी : आय एम ग्रेटा या माहितीपटातून जगभरातल्या पर्यावरणाचा पुळका आलेल्या पोकळ आश्वासने देणाऱ्या नेत्यांवर आसूड ओढतो. ज्या वयात हसायचे, खेळायचे, बागडायचे, त्या वयात ग्रेटा थनबर्ग वातावरणातील बदलाची गंभीरता लोकांना सांगत असते.

किशोरवयीन कार्यकर्ती म्हणून जे लोक तिला डोक्यावर घेत असतात, त्यांचा फोलपणा या माहितीपटातून दिग्दर्शक नाथन ग्रॉसमन या स्वीडिश निर्मात्याने मांडला आहे. अतिशय संवेदनदशील असलेल्या ग्रेटाचा नेत्त्यांकडून झालेला भ्रमनिरास आणि जगभरातून युवकांकडून मिळालेला प्रतिसाद याचा भक्कम प्रवास या ८७ मिनिटांच्या माहितीपटातून दिग्दर्शकाकडून मांडला आहे.

क्लायमेट चेन्जबद्दलची गंभीरता सांगण्यासाठी आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी अवघ्या १५ वर्षाची ग्रेटा स्वीडिश संसदेसमोर बसून निदर्शने करते, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावतात. ती लोकांना प्रश्न विचारते की, जर तुमच्या घराला आग लागली असेल तर कसे वागाल. अगदी तसेच तुम्ही या प्रश्नांवर आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे. मोठ्यांनी या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घातलेले नाही, म्हणून लहान मुलांना घालावे लागते आहे, असे तिचे याप्रश्नी उत्तर असते. जगभरातल्या युवकांनी यामुळे त्यांचे भविष्य सुधारले पाहिजे.

दिग्दर्शक नाथन ग्रॉसमन यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रामुख्याने ज्यांनी पर्यावरणाचा ठेका घेतलेला आहे, अशा पंडितावर ग्रेटाचा मोठा आक्षेप आहे. तो या माहितीपटातून अधिक ठळक होतो. विशेषतः ग्रेटासारख्या छोट्या मुलीनं असा प्रश्न  उपस्थित करावा, हे अनेकांना रुचले नाही. त्यामुळे त्या लोकांना ग्रेटाने उघडे पाडले आहे.

आपले राजकीय लक्ष्य गाठण्यासाठी ग्रेटा हे सारे करते, असा आरोप करणाऱ्यांना ग्रेटा सांगते, माझी लढाई त्यांच्याविषयी नाही. या गंभीर विषयाला वाचा फोडणे हे आहे. आपल्या पालकांनाही ती हे ठणकावून सांगते. ग्रेटा जगभरातील नेत्यांना व्याख्याने देत असते, त्यांना शिकवत असते, हे अनेकांना आवडलेले नाही, पण ग्रेटा त्याचा विचार करत नाही. ग्रेटा जगभर कॉन्फरन्स आणि पार्लमेंट मध्ये जे बोलते त्याचा काही भाग माहितीपटात दाखविलेला आहे. 

काही जागतिक पातळीवरील नेत्यांची आणि तिची झालेली चर्चा आणि भेटी यात दाखवलेल्या आहेत. यामध्ये फ्रान्सचे इम्यानुल मॅक्रॉन, पोप,अर्नोल्ड स्क्वरझनेगर या व्यक्तींचा समावेश आहे. २०१९ मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या युनायटेड नेशन्स क्लायमेटअक्शन समिटसाठी तिने केलेले उड्डाण याबद्दल सांगून माहितीपट संपतो.बदल हा होणारच आहे, तुम्हाला आवडो अथवा ना आवडो, असे सां ग्रेटा एका वाक्यात सांगून टाकते.

माहितीपटाबद्दल थोडेसेआय एम ग्रेटा हा माहितीपट ग्रेटा थनबर्ग या युवा कार्यकर्तीवर आधारित आंतरराष्ट्रीय निर्मिती संस्थाचा प्रकल्प आहे. या माहितीपटात तिने स्वतः काम केले आहे. ७७ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ३ सप्टेंबर २०२० रोजी याचा वर्ल्ड प्रीमियर झाला. १३ नोव्हेंबर २०२० रोजी हुलू येथे तो प्रदर्शित झाला. डिसेम्बर २०१९ रोजी नाथन ग्रॉसमन याची घोषणा केली. ११ सप्टेंबर २०२० रोजी टोरंटो, ३ ऑक्टोम्बर २०२० रोजी हॅम्बुर्गआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो दाखवण्यात आला. अमेरिका आणि जर्मनीत तो प्रदर्शित झाला आहे. 

टॅग्स :इफ्फीगोवा