Join us  

'काहीही हं श्री' कसे झाले व्हायरल? अभिनेता शशांक केतकरने सांगितले न ऐकलेले किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 2:39 PM

Honar Sun Mi Hya Gharchi : २०१३ साली होणार सून मी ह्या घरची ही मालिका भेटीला आली होती. ही मालिका बंद होऊन बराच काळ उलटला आहे. या मालिका आणि पात्रांचे प्रेक्षकांच्या मनातील घर कायम आहे.

छोट्या पडद्यावर २०१३ साली होणार सून मी ह्या घरची (Honar Sun Mi Hya Gharchi) ही मालिका भेटीला आली होती. ही मालिका बंद होऊन बराच काळ उलटला आहे. या मालिका आणि पात्रांचे प्रेक्षकांच्या मनातील घर कायम आहे. या मालिकेचे दिग्दर्शन मंदार देवस्थळीने केले होते. यातील श्री-जान्हवीची जोडी घराघरात हिट ठरली होती. तसेच जान्हवीचे तीन पदरी मंगळसूत्र, तिचे 'काहीही हं श्री' म्हणणं हे खूप लोकप्रिय झाले होते. तसेच यावरून बऱ्याचदा मीम्सही पाहायला मिळतात. दरम्यान आता या मालिकेत श्रीची भूमिका साकारणारा अभिनेता शशांक केतकर(Shashank Ketkar)ने 'काहीही हं श्री' या डायलॉग्जमागचा किस्सा सांगितला आहे.

होणार सून मी ह्या घरची मालिकेत सहा सासूंची कथा दाखवण्यात आली होती. जान्हवीच्या आयुष्यात जेव्हा श्री येतो तेव्हा तिचे संपूर्ण विश्वच बदलून जाते. त्यातून लग्नानंतर सहाही सासूंची मनं जिंकून जान्हवी सगळ्यांनाच एक करून घेते. त्यामुळे ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांना खूप भावली. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, एका पोडकास्टमधून शशांकने या मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी तो म्हणाला की, 'काहीही ही श्री' हा डायलॉग नक्की कसा व्हायरल झाला होता.

प्रत्येक विनोद आणि मीम्समध्ये हे तीन शब्द असायचेशशांक म्हणाला, त्यावेळी सोशल मीडिया आजच्या इतका सक्रीय नव्हता. त्यामुळे अनेकांना याबद्दल फारसे माहितीही नव्हते. पण तरीही ते शब्द इतके लोकप्रिय झाले की प्रत्येक विनोद आणि मीम्समध्ये हे तीन शब्द असायचे. आम्हीही त्या गोष्टीचा आनंद घेत होतो. अजूनही मला ते मीम्स दिसले की हसू येते. 

प्रेक्षक सेटवर जान्हवीला पैसे द्यायला यायचे

शशांकसोबत या मालिकेत निर्मात्या सुनील भोलाणे देखील होत्या. त्यांनी या मालिकेच्या शुटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही तेव्हा तो ट्रॅक चित्रीत करत होतो की जान्हवीच्या बाबांच्या गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. तर तो पाहून प्रेक्षक हे सेटवर यायचे आणि तेजश्रीला पैसे द्यायचे. तिच्या बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन व्हावं यासाठी तिचे चाहते तिला मदत करण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही तेव्हा हे पाहून खरंच खूप थक्क झालो होतो की या मालिका प्रेक्षकांना या किती आपुलकीच्या वाटतात. 

टॅग्स :शशांक केतकर