Join us

कलाकारांसाठी कसा असणार गणेशोत्सव?

By admin | Updated: September 5, 2016 02:20 IST

गणेशोत्सव म्हटला की, सर्व भक्तांमध्ये एक प्रकारचा उत्साह असतो.

गणेशोत्सव म्हटला की, सर्व भक्तांमध्ये एक प्रकारचा उत्साह असतो. प्रत्येक जण गणेशाच्या आगमनाच्या तयारीला मोठ्या उत्साहात लागलेला असतो. घराघरांपासून ते शहराच्या प्रत्येक ठिकाणी गणेशभक्त गणेशाचे स्वागत करण्यात व्यग्र असतात. यामध्ये प्रेक्षकांचे लाडके मराठी कलाकार तरी कसे मागे राहतील. यंदाही मराठी कलाकार मोठ्या दिमाखात गणेशोत्सव साजरा करणार आहेत. हा गणेशोत्सव त्यांच्यासाठी कसा खास असणार आहे याविषयी कलाकारांनी ‘लोकमत सीएनएक्स’शी साधलेला मनमोकळा संवाद...भूषण प्रधान घरामध्ये गणपती बसविण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न यंदा पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर या गणेशोत्सवाची परंपरा माझ्या नवीन घरातूनच सुरू करतो याचा मला अधिक आनंद होत आहे. या गणेशोत्सवात माझ्या आईने स्वत: बनवलेली शाडूच्या गणपतीची मूर्ती आम्ही स्थापन करणार आहोत. यामुळे हा आनंद द्विगुणीत झाला आहे. स्वप्निल जोशी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपलादेखील खारीचा वाटा असावा. या उद्देशाने आम्ही पंचधातूच्या मूर्तीची स्थापना करतो. तसेच डेकोरेशन अगदी साधे असते. पण मायराला लाइटिंग पाहायला खूप गंमत वाटते. त्यामुळे यंदा लाइटिंग खूप छान करणार आहे. त्याचप्रमाणे मायराचा हा पहिलाच गणेशोत्सव असल्याने आम्ही खूप आनंदित आहोत. मायरा या उत्सवात पहिल्यांदाच मित्रमंडळी, नातेवाईक या सर्वांना भेटणार आहे. समृद्धी पोरे यंदा आमच्या घराण्याचं गणेशोत्सावाचं हे ५५वं वर्ष आहे. काही वर्षांपासून आम्ही इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतो. तसेच आमच्या घरी गौरीही येतात. त्यामुळे खूप मजा येते. या अशा उत्सवामुळे सर्व नातेवाईक मंडळी एकत्र येतात हे जास्त महत्त्वाचं असतं. सुनील पाल आमच्यासाठी हा उत्सव खूप खास असतो. कारण या उत्सवात माझा लहान मुलगा स्वत: चित्रशाळेत जाऊन गणपतीची मूर्ती बनवतो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो, पण गणपतीच्या स्वागतासाठी मी मुंबईला पोहोचतोच. मृण्मयी देशपांडे गौरी-गणपती हा उत्सव आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतो. सगळे बहीण-भाऊ एकत्र येऊन गणेश आगमनाचे स्वागत करतो. पण मला नेहमी असे वाटते, की चौका-चौकांत गणपती न बसविता ‘एक गाव-एक गणपती’ हीच लोकमान्य टिळकांची संकल्पना लोकांनी सुरू करावी. मंदार चांदवलकर गणेशोत्सव हा संपूर्ण शहरात जल्लोष करणारा सण असतो. या गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत खरंच खूप आनंददायी वातावरण असते. या गणेशोत्सवात आम्ही पर्यावरणाला हानी पोहोचवू नये यासाठी शाडूच्या गणपतीची स्थापना करतो; आणि त्याचे विसर्जनदेखील घराच्या बाहेर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन करतो. त्यानंतर त्याची माती झाडांना टाकतो.