Join us  

ऑस्कर सोहळ्यात भारताच्या वाट्याला काय आले तर एक भावुक क्षण...! इरफान, भानू यांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 10:28 AM

Oscars 2021: हा एक क्षण तमाम भारतीय प्रेक्षकांना भावुक करणारा ठरला.

ठळक मुद्देऑस्कर विजेत्या प्रख्यात वेशभूषाकार दिवंगत भानू अथय्या यांनाही ऑस्कर सोहळ्यात श्रद्धांजली वाहण्यात आली.

ऑस्करच्या (Oscars 2021) आज रंगलेल्या शानदार सोहळ्यात अनेक बदल पाहायला मिळाले. सर्वप्रथम कोरोनामुळे हा सोहळा काहीसा विलंबाने पार पडला. विशेष म्हणजे, यंदाच्या या सोहळ्यात ना होस्ट होता, ना प्रेक्षक. डॉल्बी थिएटरमध्ये रंगलेल्या या सोहळ्यात भारताच्या वाट्याला काय आले तर एक भावुक क्षण. होय, बॉलिवूड अभिनेता दिवंगत इरफान खान ( Irrfan Khan)आणि ऑस्कर विजेत्या प्रख्यात वेशभूषाकार दिवंगत भानू अथय्या (Bhanu Athaiya) यांना या सोहळ्यात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा क्षण तमाम भारतीय प्रेक्षकांना भावुक करणारा ठरला. (  Oscars 2021 pays tribute to Irrfan and Bhanu Athaiya in In Memoriam segment)

ऑस्कर्स इन मेमोरियम सेक्शनमध्ये बॉलिवूड व हॉलिवूडमध्ये काम करणा-या इरफानचा उल्लेख करण्यात आला. अभिनय क्षेत्रातील त्याच्या अपूर्व कामगिरीचे कौतुक करत, त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. इरफानशिवाय, सिसली टायसन, क्रिस्टोफर प्लमर आणि  चॅडविक बोसमेन यांनाही श्रद्धांजली वाहिली गेली.  2020-21 या काळात या कलाकारांनी जगाचा अलविदा म्हटले.29 एप्रिल 2020 रोजी इरफान खानने जगाचा निरोप घेतला होता. तो न्युरोएंडोक्राइन ट्युमर नामक आजाराने ग्रस्त होता. इरफानने बॉलिवूडमध्ये अनेक दमदार सिनेमे दिलेत. हॉलिवूडच्या काही सिनेमांमध्येही त्याने काम केले. ए माइटी हार्ट, स्लमडॉग मिलियनीयर, लाइफ ऑफ पाय, द अमेजिंग स्पाइडर मॅन, ज्युरासिक वर्ल्ड अशा अनेक हॉलिवूड सिनेमांत इरफानने काम केले होते.

भानू अथय्या यांनाही वाहिली श्रद्धांजली

ऑस्कर विजेत्या प्रख्यात वेशभूषाकार दिवंगत भानू अथय्या यांनाही ऑस्कर सोहळ्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. 1982 साली प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटासाठी त्यांनी ऑस्कर पटकावला होता. भानू यांचा जन्म कोल्हापुरात झाला होता. ‘गांधी’ साठी ऑस्कर मिळाल्यानंतर ‘लगान’ या सिनेमासाठीही त्यांना नामांकन मिळाले होते. थोडक्यात त्यांचा हा पुरस्कार हुकला होता. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांसाठी वेषभूषाकार म्हणून काम केले होते. 1 5 आक्टोबर 2020 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते.

टॅग्स :इरफान खानऑस्कर