Join us  

अभिनेत्री दीप्ती देवीचा 'काहे कोई आंसू' हा पहिला हिंदी अल्बम तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 4:59 PM

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी दीप्ती, 'काहे कोई आंसू'मधून म्युझिक विडिओमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवतं आहे.

डीजे ब्राव्हो आणि शक्ती मोहन  यांचे  'द छमिया सॉंग', 'डीजे ब्राव्हो' ही गाणी नुकतीच तुफान हिट झाली होती. डीजे ब्रावो खास या गाण्यासाठी भारतात आला होता . या लोकप्रिय गाण्यांच्या यशानंतर, एक नवाकोरा म्युझिक विडिओ  प्रदर्शित झाला आहे. 'वन वे तिकीट' या चित्रपटाचा संगीतदिग्दर्शक गौरव डगावकर याने 'काहे कोई आंसू' हे नवे गाणे संगीतबद्ध केले आहे  तर या गाण्याचे गीतकार अंगशुप्रिया साहा आहेत. 

'काहे कोई आंसू' या  सॉंगफेस्ट इंडिया च्या नवीन हिंदी गाण्याच्या म्युझिक विडिओमध्ये, मराठी अभिनेत्री दीप्ती देवी अभिनय करत असून या गुणी अभिनेत्रीने,या गाण्याद्वारे  म्युझिक विडिओच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. कलकत्त्यामधील सुप्रसिद्ध गायिका लग्नजिता चक्रवर्ती हिच्या मधुर आवाजात, हे गाणे ऐकण्याची संधी तिच्या चाहत्यांना मिळणार आहे. 'कंडिशन्स अप्लाय' आणि 'नाळ' या चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर व 'मला सासू हवी' आणि 'अंतरपाट' या मालिकांमधून छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी दीप्ती, 'काहे कोई आंसू'मधून म्युझिक विडिओमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवतं आहे. 

या अप्रतिम गाण्याविषयी आणि आपल्या पहिल्यावहिल्या म्युझिक विडिओबद्दल बोलताना अभिनेत्री दीप्ती देवी म्हणाली;"म्युझिक विडिओमधील पदार्पणाविषयी मी फारच उत्सुक होते. दर्जेदार शब्दरचना आणि अप्रतिम संगीत यामुळे हे गाणे खास जमून आले आहे. लग्नजिताच्या उत्तम आवाजाने या गाण्याला चार चांद लावले आहेत." 

संगीतकार आणि सॉंगफेस्ट इंडिया चा संस्थापक गायक व संगीत दिग्दर्शक गौरव डगावकर यानेही या गाण्याविषयी आपला अनुभव शेअर केला; "लग्नजिता आणि दीप्ती देवी या दोघी माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत. 'काहे कोई आंसू'च्या निमित्ताने दोघींसोबत एकत्र काम करायची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद झाला. सध्या इंटरनेटवर  youtube आणि इतर सोशल संगीत मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाव्यतिरिक्त प्रायव्हेट अल्बम द्वारे  सादर केलेली ही गाणी सुद्धा प्रेक्षकांना आवडतात आणि यांना लाखो करोडो लोकं बघतात. नुकतचे  'काहे कोई आंसू' हे गाणे प्रदर्शित झाले आहे."

टॅग्स :दीप्ती देवी