Join us  

गोविंदा रे गोपाळा दहीहंडीचा ‘काला’

By admin | Published: September 06, 2015 2:36 AM

‘अरे गोविंदा रे गोपाळा’ असे म्हणत आता सध्या सगळ्यांना वेध लागले आहेत ते गोकुळाष्टमीचे. कृष्णजन्मानंतर दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत.

‘अरे गोविंदा रे गोपाळा’ असे म्हणत आता सध्या सगळ्यांना वेध लागले आहेत ते गोकुळाष्टमीचे. कृष्णजन्मानंतर दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. उंचावर दहीहंड्या बांधणे, त्या फोडण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून गोविंदांचे ग्रुप्स बोलावणे असे चित्र दहीहंडीच्या दरम्यान पाहायला मिळते. कोणता ग्रुप दहीहंडी फोडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. घराच्या खाली किंवा चौकांमध्ये दहीहंड्या लागलेल्या असतील ती फोडण्यासाठी थर रचणाऱ्या गोविंदांच्या अंगावर पाणी टाकण्याची मजामस्ती काही निराळीच असते. गोकुळाष्टमी असो किंवा गणेशोत्सव असो, या सणांचे वेड भल्याभल्यांना चुकलेले नाही. या सणांंवर आधारित एखादे गाणे किंवा प्रसंग घेतला तर त्या चित्रपटाकडे मराठी प्रेक्षक हा हमखास खेचला जातोच, अशी एक धारणा निर्माता-दिग्दर्शकांची आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये दहीहंडी आणि गणेशोत्सवाला मराठी चित्रपटांमध्ये हमखास स्थान मिळू लागले आहे. आता हेच पाहा ना, ‘हमाल दे धमाल’, ‘मोरया,’ ‘गोविंदा’ आणि ‘पेइंग घोस्ट’ या चित्रपटांमध्ये दहीहंडीवरील चित्रित झालेली गाणी तुफान गाजली. मंडळाकडून आयोजिण्यात येणाऱ्या दहीहंडीच्या कार्यक्रमात या गाण्यांची हमखास चलती असते. काहीसा हाच फंडा आता छोट्या पडद्यावरदेखील वापरला जाऊ लागला आहे. अगदी विविध वाहिन्यांवरदेखील दहीहंडीशी सुसंगत असे प्रसंग घेण्यात आले आहेत. याला म्हणतात, सणाच्या पार्श्वभूमीवरील प्रदर्शनाचा नवा फंडा. छोट्या पडद्यावरच्या ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतही आता गोकुळाष्टमीचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण ही दहीहंडी गोविंदा नव्हे तर गोपिका फोडणार आहेत. तुम्हीही या दहीहंडीचा अनुभव घेणार ना मग!