Join us  

गिरीजा ओकची मराठी प्रायोगिक रंगभूमीवर एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 7:46 PM

सतीश आळेकरांच्या 'ठकीशी संवाद' नाटकात दिसणार शीर्षक भूमिकेत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - चित्रपट, मालिका, वेब सिरीज, नाटक अशा सर्व माध्यमांमध्ये ठसा उमटवणारी गिरीजा ओक मागच्या वर्षी शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. मराठीसोबत हिंदी-इंग्रजीमध्येही सक्रिय असलेली गिरीजा 'ठकीशी संवाद' या सतीश आळेकर लिखित नाटकाद्वारे मराठी प्रायोगिक रंगभूमीवर पदार्पण करणार आहे.

गिरीजाने यापूर्वी 'दोन स्पेशल' हे एकमेव मराठी व्यावसायिक नाटक केले आहे. गिरीजाची मुख्य भूमिका असलेल्या 'गौहर' या इंग्रजी नाटकाचे प्रयोग सध्या यशस्वीपणे सुरू आहेत. इंग्रजी आणि हिंदी भाषेतील प्रायोगिक नाटकांमध्ये दिसलेली गिरीजा मराठी प्रायोगिक नाटकांमध्ये कधीच दिसली नाही. 'ठकीशी संवाद' या नाटकाद्वारे ती ही उणीवही भरून काढत मराठी प्रायोगिक नाटकात दिसणार आहे. १० मे रोजी पुण्यामध्ये ज्योत्स्ना भोळे सभागृहातील श्रीराम लागू सेंटरमध्ये 'ठकीशी संवाद' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर होणार आहे. रंगभूमी दिनाच्या दिवशी या नाटकाचे पोस्टर लाँच करण्यात आले होते. सतिश आळेकरांचे शिष्य दिग्दर्शक अनुपम बर्वे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकाबाबत 'लोकमत'शी एक्सक्लुझीव्ह बातचित केली.

ती म्हणाली की, अनुपर यांनी या नाटकात काम करण्याबाबत विचारलं, तेव्हा संकल्पना आवडल्याने प्रायोगिक रंगभूमीवर दाखल होण्याचा योग जुळून आला. यात मी आणि सुव्रत जोशी असे दोनच कलाकार आहोत. आळेकरांची संहिता खूप इंटरेस्टिंग असते आणि ते एकाच नाटकात बऱ्याच गोष्टींबद्दल भाष्य करतात. यापूर्वी जे कधीही केले नाही ते करायला मिळत असल्याने मजा येते. यात मी ठकीच्या भूमिकेत आहे. माझ्याशी केलेला संवाद म्हणजेच हे नाटक आहे. तो काय संवाद आहे, तो कशाबद्दल आहे, कोण संवाद करतेय या सगळ्या गोष्टींसाठी नाटक पाहायला हवे. आळेकरांच्या नाटकांमध्ये प्रेक्षकांना पानात सर्व वाढून दिले जात नाही. त्यांच्या नाटकाचा अर्थ लावताना प्रेक्षकांचाही कस लागत असतो. त्यांच्या नाटकाचा प्रत्येक व्यक्तीला समजलेला अर्थ वेगळा असू शकतो. सध्या मुंबई-पुण्यात सर्वांची वेळ सांभाळून या नाटकाची तालीम सुरू असल्याचेही गिरीजा म्हणाली.कालातीत नाव...'ठकी' या नावामुळे ती नक्की कोण आहे याबद्दल संभ्रमच आहे. एखादे नाव कोणत्या काळातील आहे हे त्या नावावरून ओळखता येते, पण ठकी हे कालातीत नाव असल्याने मुद्दाम निवडण्यात आले आहे. हाच कळीचा मुद्दा...ठकी नेमकी कोण आहे, ती कशी आहे, ती का आहे हे नाटक बघितल्यावरच कळेल. तिच्याशी काय बोलण्यात येत आहे, कोणत्या प्रकारचा संवाद साधला जाणार आहे, हाच मूळात कळीचा मुद्दा आहे.प्रयोगांतून खुलणार ठकी...ठकी नेमकी कशी असेल याचा शोध सुरूच आहे. हे कॅरेक्टर कसे खुलून येईल याची उत्सुकता मलाही असून, प्रयोगागणिक ते अधिकाधिक खुलत जाईल. हळूहळू ठकीच्या जवळ जात असल्याचेही ती म्हणाली.

टॅग्स :गिरिजा ओक