ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात आलेला दुरावा कमी करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे. नेहमी परखडपणे आपलं मत मांडणा-या ऋषी कपूर यांनी झालं गेलं सगळं विसरुन पुन्हा एकत्र येण्याचं आवाहन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरला केलं आहे. ऋषी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडलं.
ऋषी कपूर यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, "आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादमध्ये कपिल शर्मासारखा दिसणारा खेळाडू आहे. कोणी सुनील ग्रोव्हरला एखाद्या संघात पाहिलं का ? एकत्र या मित्रांनो !". गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला वाद शमवण्याचा प्रयत्न ऋषी कपूर यांनी केला आहे.
मात्र सुनील ग्रोव्हरने हे प्रकरण अत्यंत गंभीरपणे घेतलं असून पॅच अप करण्याचा कोणत्याच मूडमध्ये तो दिसत नाही. ऋषी कपूर यांच्या ट्विटला उत्तर देत सुनील ग्रोव्हरने सांगितलं की, "सर मी रिटायर्ड हर्ट असल्याने या सत्रात खेळत नाही आहे".
सुनील ग्रोव्हरने आपल्याला कपिल शर्मासोबत काम करण्यात कोणताच रस नसल्याचं स्पष्ट करुन टाकलं आहे. त्यामुळे भविष्यात दोघांना एकत्र पाहण्याची संधी मिळणं थोडं काठीणच आहे.
ऋषी कपूर यांनी आपलं आत्मचरित्र "खुल्लम खुल्ला"चं प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमात पत्नी नितू सिंगदेखील उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांची ही विनंती पाहता इतकं आश्चर्य वाटण्याची काही गरज नाही.
ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि मेलबर्नमध्ये शोसाठी कपिल आपल्या सहकाऱ्या सोबत गेला होता. हा शो संपवून ऑस्ट्रेलिया ते मुंबई असा इकॉनॉमी क्लासने प्रवास करतेवेळी कपिल शर्माने दारुच्या नशेत सुनिल ग्रोवरला मारहाण केली होती. या मारहाणीवेळी कपिल शर्मानं सुनिल ग्रोवरसाठी अपमानास्पद भाषेचाही वापर केली होती. यानंतर सुनील ग्रोव्हरने कपिल शर्माची साथ सोडत कार्यक्रमातून काढता पाय घेतला.